Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अहमदाबादला विमानतळ मुख्यालय अद्याप तरी हलविण्याचा निर्णय झालेला नाही; अदानी समुहाचे स्पष्टीकरण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतल्याचं वृत्त समोर आल्यानं राजकीय वातावरण तापलं. मात्र आता अदानी समुहानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यालय अद्याप तरी हलवण्याबद्दलचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत तशा चर्चा निव्वळ अफवा असल्याचं अदानी समुहानं म्हटलं आहे.

‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला नेणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची मुख्यालयं मुंबईतच राहतील. मुंबईच्या अभिमानात भर घालत राहू हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू,’ असं अदानी समुहानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अदानी समूहानं विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. तुम्ही गरबा कराल, तर आम्हाला झिंगाट दाखवावा लागला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदानी समुहाला इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनं थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटलं. तसंच, अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इन्स्टिटयूट गुजरातला नेली जात आहे. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारला खरमरीत इशारा दिला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *