Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व घोडबंदर किल्ल्याचे २६ जानेवारीला होणार लोकार्पण?

मिरा-भाइर्दर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील सुरू असलेल्या अनेक विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या समवेत शहर अभियंता दीपक खांबीत व इतर अधिकारी यांचा संयुक्त दौरा आज आयोजित करण्यात आला होता.

या पाहणी दौऱ्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाजपा नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या नावाने होत असलेले कलादालन, तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एका मजल्यावर सुमारे १००० या पध्दतीने तीन मजल्यावर सुमारे ३००० लोकांचा कार्यक्रम होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेले सांस्कृतिक हॉल, घोडबंदर किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित पुतळा, घोडबंदर खाडी किनारा, जलवाहतुकीसाठी मेरी टाईम बोर्डाच्या माध्यमातून फाऊंटन हॉटेल समोर निर्माण होत असलेली प्रवासी जेट्टी, साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर चेना रिव्हर फ्रंट या प्रकल्पांची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यावर असताना स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या अंतर्गत सजावटीचे काम पुढील महिन्यात चालू करण्याच्या सुचना ठेकेदाराला देऊन ३ महिन्यामध्ये ते काम तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला आयुक्तांनी दिल्या आहेत.

तसेच तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी हॉलचे काम ३१ डिसेंबर पुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना ठेकेदाराला दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व घोडबंदर किल्ल्याचे उद्घाटन २६ जानेवारीला करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. तसेच मेरी टाईम बोर्डाची एन.ओ.सी. आल्यानंतर तातडीने घोडबंदर खाडी किनाऱ्यावर सुशोभिकरण करण्याचे काम नगर अभियंता दिपक खांबीत यांना दिले. त्याचबरोबर सागरमाला योजने अंतर्गत चालू होणारी जलवाहतुक पुढील वर्षात केव्हाही चालू होत असल्याने तयार झालेल्या प्रवासी जेट्टीचे सुशोभिकरण व रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सुचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले.

चेना रिव्हर फ्रंटच्या कामाला वन खात्याची परवानगी मिळालेली असून वाईल्ड लाईफ कमिटीची परवानगी मिळाल्याबरोबर ते काम व नदीशेजारी असलेल्या १८ मिटर रस्त्याचे काम ताबडतोब चालू करून पुढील वर्षी पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे १४०० कोटी रूपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून देण्यात आल्याने सदरची सर्व कामे तातडीने पुर्ण होतील असा विश्वास आयुक्त संजय काटकर यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना दिलेले आहे.

त्यामुळे मिरा-भाइर्दर शहरातील विकास कामांना चालना मिळणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर व पालिका अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्याच्या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत आयुक्त संजय काटकर, शहरअभियंता दिपक खांबीत, उपअभियंता यतीन जाधव तसेच महानगरपालिकेचे व वन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. परंतु ही सर्व विकास कार्य नियोजित वेळेवर पूर्ण होतील का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *