Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे, असं म्हणत “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

“नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले की, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा ‘महाराष्ट्र’ आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्र यात फरक आहे. सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *