Latest News महाराष्ट्र

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर – परिवहनमंत्री अनिल परब

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी: राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.२०) परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,’ असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *