Latest News आपलं शहर ताज्या

मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ केंद्र सरकारवर सडकून टीका

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकीकडे लोक कोरोनामुळे संकटात असतांना दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. मात्र, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. मे महिन्यात एकूण आठ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाचे दर स्थिर होते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर दरवाढ सुरू झाली. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज दिल्ली-मुंबईमध्ये पेट्रोल दरात विक्रमी वाढ झाली आहे. इंधनाच्या कच्च्या किंमतीत घट असूनही तेल विपणन कंपन्यांनी आज किंमती वाढवल्या आहेत. आज पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रमी उंचावर आहेत. त्याचबरोबर देशातील बर्‍याच भागात पेट्रोल १०० च्या वर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

काय आहे आजचा दर?

आजच्या बदलांनंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर ९२.३४ रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८२.९५ रुपये झाले आहे. मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.०९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रतिलिटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १००.३८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटरला विकले लखनौमध्येही पेट्रोलचे दर ९० पार झाले आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *