Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

४८ तासांत माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांनी भाजपचे स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांना बजावली मानहानीची नोटीस!

संपादक: मोईन सय्यद/ मीरा भाईंदर प्रतिनिधी

मिरारोड- जमिनीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांचेवर आरोप करणे भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना आता चांगलेच महागात पडण्याची चिन्हं दिसत असून पत्रकार परिषदेत मुजफ्फर हुसैन यांचे नाव घेऊन बिन बुडाचे आरोप केल्याचा दावा करून काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांनी दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की जर दिनेश जैन यांनी ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी न मागितल्यास त्यांचे विरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मीरारोड पूर्वेकडील शांती नगर सेक्टर- ९ मधील मौजे पेणकर पाडा, सर्व्हे क्र. ३८/२ जुना, २०६/२ नवीन या आरक्षित भूखंड प्रकरणी स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांनी जून महिन्यात पत्रकार परिषद घेऊन मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन व त्यांच्या मालकीच्या असलेल्या अस्मिता बिल्डरवर आरोप केले होते. दिनेश जैन यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर करून आरोप केला होता की, मुजफ्फर हुसैन यांनी मीरा भाईंदर महानगरपालिके कडून संबंधित जागेचे विकास हस्तांतरण प्रमाणपत्र (TDR) घेतले परंतु महानगरपालिकेला ती जागा हस्तांतरित केली नाही त्यामुळे महानगरपालिचे फार मोठे नुकसान झाले असून महानगरपालिकेने या संदर्भात तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून मुजफ्फर हुसैन यांनी हे सर्व आरोप खोडून काढीत आपली बाजू स्पष्ट करीत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना जाहीर आवाहन केले होते की दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसाच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने मुझफ्फर हुसैन यांनी आता स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली असून नोटीस प्राप्त झाल्याच्या ४८ तासात सदर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करीत विनाअट जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे नोटीसीद्वारे  कळविण्यात आले आहे.

याबाबत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांचेशी संपर्क साधला असता मला अजून तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, जेव्हा नोटीस मिळेल तेव्हा माझ्या वकिलांशी सल्लामसलत करून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण चांगलेच तापणार असणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *