Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांचीच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला दिले असून उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला हा मोठा दणका दिला असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाला “शिवसेना” हे नाव दिले असून मूळ पक्षाचे धनुष्य बाण हे चिन्ह ही एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आले आहे.

ठाकरे घराण्याकडे आता शिवसेना नाही

निवडणूक आयोगाने आज हा निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाच्या नाव आणि अधिकारावरून लढाई सुरू होती. यामुळे ठाकरे घराण्याच्या हातून आता तरी शिवसेना निसटली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवेसना प्रमुख म्हणून ओळखले जाणार आहेत.

शिवसेनेतील बदल आयोगाला माहितीच नाहीत

२०१८ मध्ये शिवसेना पक्ष घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ च्या पक्ष घटनेत समाविष्ट केलेले पक्षांतर्गत लोकशाही नियम बदलण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून बदलांना मान्यता दिली होती. पण २०१८ मधील बदल नोंदवले गेले नाहीत असे आजच्या आयोगाच्या निकालात स्पष्ट झाले आहे. २०१८ मध्ये शिवसेना पक्षाने पक्ष घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नसल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पक्षीय निवडणुका न घेताच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला आहे असे आयोगाने म्हटले आहे.

हा निर्णय लोकशाही ला घातक

आजचा हा निर्णय हा अत्यंत अनपेक्षित आहे चोरालाच तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, देशात आता बेबंदशाही माजली आहे अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी यावर दिली आहे. आमची मशाल आता पेटली आहे, आमची शिवसेना लेचीपेची नाही, आमच्या देव्हाऱ्यात शिवसेना प्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आहे तो आमच्याकडेच राहील असेही ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, आयोगाचा निकाल हे कट कारस्थान आहे हे स्पष्ट झाले आहे, मात्र धनुष्यबाण ओरबाडून घेता येणार नाही, चोरांना आता आनंद झाला असेल पण तो अल्पकाळच टिकेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *