Latest News कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गट हे आता आपापल्या पक्षासाठी कोणतं नाव वापरू शकतात ? ऍड. उज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा आणि शिवसेना हे नाव आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात,’ असं प्राथमिक मत ऍड. उज्वल निकम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.

निवडणूक आयोगाचा हा अंतिम निर्णय नाही. दोन्ही गटांकडून पुरावे सादर करणे, युक्तिवाद करणे या गोष्टींना बराच कालावधी लागू शकतो, त्यामुळे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे तात्पुरते आदेश पारित केले असल्याचं ऍड. उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. ‘या निर्णयाविरुद्ध दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. दोन्ही गटांना अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर उमेदवार उभे करावयाचे असतील तर ते निवडणूक आयोगाच्या निकालाला ते आव्हान देऊ शकतात, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबत निकाल देण्यास निवडणूक आयोगाला वेळ लागू शकतो, साधारणपणे सहा महिन्यात निवडणूक आयोगाकडून अंतिम निकाल अपेक्षित असतो. निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत. आता तोंडी पुरावा काय सादर केला जातो, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आयोगाचा निकाल तसेच शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह याबाबतच्या वादाचे भवितव्य हे ठरेल,’ असंही यावेळी बोलताना ऍड. उज्वल निकम यांनी सांगितलं.

दोन्ही गटांसमोर नावासाठी आता कोणते पर्याय ?

‘दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये ‘शिवसेना’ हे नावच वापरता येणार नाही का ? याबाबत यापूर्वीच्या अशा प्रकारणांमध्ये दिलेले निकाल अभ्यासावे लागतील. तसेच शिवसेना नावाच्या पुढे आणि मागे काहीतरी शब्द घालून ते दोन्ही गटांना वापरता येऊ शकतं,’ असं मत ऍड.उज्वल निकम यांनी मांडलं आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *