Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

‘आगरी युथ फोरम डोंबिवली’ आयोजित १८ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्यामुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या “आगरी युथ फोरम” या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या चातकासारखी वाट पहात असतात असा अठरावा अखिल भारतीय आगरी महोत्सव दिनांक १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

या महोत्सवाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री. कपिल पाटील, माननीय मंत्री श्री.रवींद्र चव्हाण व समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

“कोरोना” जागतिक महामारीमुळे दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर साजरा होणाऱ्या येत्या महोत्सवात आनंदाच्या पर्वणीमधे आनंद लुटण्यासाठी जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मोहोत्सवामधे भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मानपसंद वस्तूच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीतनृत्यप्रेमींना आगरी-कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट आगरी-कोळी खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनीबरोबर त्यांच्या पालकांनाही पाळण्यात बसून आकाशाएवढा आनंद घेता यावा. त्यांच्या आनंदामधे बाधा येऊ नये म्हणून महोत्सव संयोजन समितीने अत्यंत नियोजन बद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

आगरी समाज हा शेतीनिष्ठ कष्टकरी समाज आहे. साधारण शिवकाळापूर्वी शेतकरी हाच अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होता, शेतकऱ्याला विविध गरजा बारा बलुतेदार भागवत असत. धान्याच्या बदली विविध सेवा, वस्तू प्राप्त होत असत. गावातल्या गावातच एकमेकांच्या गरजा वस्तू सेवांची अदलाबदल करून भागवल्या जात असत. युवा पिढीला आपल्या पूर्वीच्या सामाजिक जीवनापद्धती बद्दल अवगत करण्यासाठी या महोत्सवमधे आपली प्राचीन संस्कृती चित्ररूपाने साकारण्यात येणार आहे. लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे जीवनचरित्र चित्ररूपाने साकारले जाणार आहे.

‘चूल आणि मूल’ या संसार चक्रात अडकलेली आमची माता भगिणी समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. आमच्या महिला समिती सदस्या महोत्सवाच्या प्रवेश शुल्क विभागाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेतच. महिलावर्गाच्या सन्मानार्थ महोत्सवमधे एक दिवस महिलांसाठी राखून ठेवलेला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. महिलांचा अध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग वाढलेला आहे हे लक्षात घेऊन आमच्या माताभागिनींचा सहभाग असलेल्या ‘हरिपाठाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समाजातील नामवंत संगीतभजनी बुवांचा ‘संगीत भजनाचा’ कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे “ज्ञानबा तुकाराम” च्या जयघोषात टाळमृदंगाच्या गजरात श्रीसंत सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील वातावरण मंगलमय होणार आहे. त्याचप्रमाणे खास महिलांसाठी “यशस्वी व आनंदी जीवनाची सूत्रे” या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामधे डॉ.संगीता पांडे (प्रभारी प्राचार्या, आदर्श कॉलेज) यांच्याशी सुसंवाद साधतील सौ.ज्योती पोहाणे (प्राचार्या, प्रगती कॉलेज) व सौ.सुप्रिया नायकर (प्राचार्या, ग्लोबल कॉलेज).

आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असूनही सध्या आपली मराठी भाषा आणि मराठी शाळा संकटात असल्याचे चित्र दिसत आहेत. मातृभाषेमधे कानावर पडणारे ज्ञान ग्रहण करणे जास्त सोपे असते हे विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे यादृष्टीने लोकजागर करण्याच्या हेतूने “मराठी भाषा व मराठी शाळा वाचवा” या विषयावरील परिसंवादामधे श्री.प्रकाश पायगुडे (कार्यवाह, मसाप पुणे) मा.आमदार श्री. बाळाराम पाटील (शिक्षक आमदार) यांचा सहभाग असेल. या कार्यक्रमाच्या समन्वयक असतील सौ.दिपाली काळे (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका).

भूमिपुत्रांनी देशाच्या हितासाठी अनेक मोठे प्रकल्प उभारणी व त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कवडीमोल भावाने शासनाला जमिनी दिल्या. त्यातून राष्ट्राचा विकास साधला गेला परंतु ज्यांनी सरकारला जमिनी देऊन, भूमिहीन झाला तो समाज आज कुठे आहे. या समाजाचे भवितव्य काय ? या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी “भूमिपुत्रांचे भवितव्य” या विषयावरील परिसंवादामधे केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री. कपिल पाटील, माजीमंत्री श्री.जगन्नाथ पाटील, माननीय श्री.दशरथदादा पाटील (अध्यक्ष, लोकनेते दि.बा.पाटील विमानतळ नामकरण समिती), श्री.जे.डी. तांडेल (प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ) सहभागी असतील. समन्वयक असतील प्रसिद्ध कवी श्री.अरुण म्हात्रे.

उद्योग-व्यवसायामधे भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांसाठी “चला तरुणांनो उद्योजक बनूया” या विषयावर जगप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे आगरी समाजातील प्रसिद्ध कवींचा सहभाग असलेला “आगरी बोली कविसंमेलन” होणार आहे.

प्रभोधनात्मक कार्यक्रमांप्रमाणेच लोकरंजन करण्यासाठी दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विध्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत. त्याचप्रमाणे “झी मराठी” वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांमधील प्रसिद्ध कलाकार आपल्या आनंदाच्या पर्वाणीमधे आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी दररोज उपस्थित राहणार आहेत आणि एक दिवस “उत्सव आनंदाचा” हा “झी मराठी” वाहिनीवरील लोकप्रिय कलाकारांचा खुमासदार कार्यक्रम होणार आहे.

महोत्सवासाठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार श्री.संजय धबडे व ओम साई डेकोरेटर्स हे नेपथ्याचे काम करणार आहेत. महोत्सव कालावधीमधे दररोज दोन महिलांना “साडी ड्रॉ” च्या माध्यमातून पैठणी चा मान मिळणार आहे. तसेच महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती असणार आहे, त्याची घोषणा महोत्सव मंचावरून एक दिवस अगोदर करण्यात येईल असे आयोजकांकडून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *