Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते चार स्विमिंग पुलांच्या कामाचे झाले भूमिपूजन!

मीरा भाईंदर शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या चारही स्विमिंग पुलांचे बांधकाम एका वर्षात पूर्ण होणार! आयुक्तांची ग्वाही

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील विद्यार्थी, तरुण, नागरिक यांच्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलावाचे भूमिपूजन रविवार 4 जून रोजी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. हे तरण तलाव पुढील एका वर्षात बांधून तयार होणार आहेत.

मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांची मागणी व गरज लक्षात घेता पुढील एका वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल, ठरलेल्या मुदतीत काम करून स्विमिंग पूल प्रत्यक्षात एका वर्षात सुरु करण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करेल, असे मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.

त्यामुळे पुढील वर्षी मीरा भाईंदरच्या नागरिकांना मोठे स्विमिंग पूल उपलब्ध होणार आहेत. हे स्विमिंग पूल प्रत्यक्षात तयार होतील तेव्हा या जल तरण तलावांमध्ये नागरिकांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम हाती घेतले जातील व स्विमिंग अकादमी सुरु केली जाईल असे आमदार प्रताप सरनाईक यांनी घोषित केले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्याने त्यांनी राज्य सरकारकडून ४० कोटींचे अनुदान या कामासाठी मंजूर करून आणले होते. त्यातून ४ ठिकाणी ऑलम्पिक साईज जलतरण तलाव (स्विमिंग पूल) बांधले जाणार आहेत.

काल रविवारी सायंकाळी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ काशीमीरा येथील महानगरपालिकेच्या उद्यानासाठी आरक्षण क्रमांक ३६८ या जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, प्रभाग १२ परिसरातील उद्यानाच्या आरक्षण क्रमांक २३० या भूखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, आरक्षण क्रमांक २४२ जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व आवश्यक सुविधेची इमारत बांधणे, प्रभाग क्रमांक ३ मधील सचिन तेंडुलकर मैदानावरील आरक्षण क्रमांक १२२ शेजारील जागा येथे ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिम बांधणे या कामाचे भूमिपूजन झाले.

प्रत्येक कामाला १० कोटींचा खर्च होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक व मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, शेकडो नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. स्विमिंग पूल आणि त्याचठिकाणी अत्याधुनिक जिम्नॅशियम इमारत बांधली जाणार असून ज्यांना पोहायला आवडते, ज्यांना पोहण्याचे प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा नागरिकांसाठी ही खूप मोठी पर्वणी ठरणार आहे.

व्यायाम करण्यासाठी तिथेच जिम व त्याच ठिकाणी स्विमिंग पूल करून तेथील तरुण व नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे सरनाईक यांनी ठरवले असून त्यानुसार कामाची डिजाईन केली गेली आहे.

या भूमिपूजन सोहळ्यात मनपा आयुक्त म्हणाले की, आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून महापालिकेला राज्य सरकारकडून स्विमिंग पूलसाठी निधी आणून दिला. त्यामुळे हे काम सुरु होत आहे. आता मनपा प्रशासन पुढील १ वर्षात चारही स्विमिंग पूल तयार करून ते चालविण्याची व त्याची देखभाल – दुरुस्ती करण्याचे कामही स्वतः महापालिकाच करेल.

नागरिक आणि तरुणांना येथे कोणतीही अडचण येणार नाही. आमदारांच्या सुचनेप्रमाणे येथे रस्ता रुंदीकरण करण्यासाठीही पालिका कार्यवाही करेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

भाईंदर पूर्वेकडील सचिन तेंडुलकर मैदानात स्विमिंग पुलचे भूमिपूजन झाले त्यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की , याठिकाणी पूर्वी डम्पिंग ग्राउंड असलेल्या जागेला आम्ही चांगले मैदान बनवले. हे खेळ आणि कार्यक्रमांचे केंद्र बनले आहे. आता येथे एका वर्षात स्विमिंग पूल होईल तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटची खेळपट्टी बनवली जाईल.

या मैदानात असलेल्या सामाजिक सभागृह स्टेजची उंची २ फुटाने वाढवली जाईल. तसेच या मैदानात ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी दोन स्वतंत्र खास उद्यानांची निर्मिती केली जाईल व त्यासाठी आमदार निधी देण्याची घोषणा आमदार सरनाईक यांनी केली. भाईंदर पूर्वेकडील पाण्याचा प्रश्न सोडवून येथे सामान दाबाने व योग्य प्रमाणात पाणी वितरण करण्याबाबत आयुक्तांनी स्वतः लक्ष द्यावे अशा सूचनाही आमदारांनी जाहीर कार्यक्रमात केल्या.

नवघर, भाईंदर पूर्व भागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. ४ जून रोजी या चारही स्विमिंग पुल कामांचा श्री गणेशा झाला आहे. मीरा भाईंदर शहराच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार असून जलतरण पटू शहरातून भविष्यात घडतील. या ठिकाणी स्विमिंग अकादमी सुरु करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाने हायवे जवळ आधी एक जलतरण तलाव बांधून झाला आहे आणि आता आणखी ४ जल तरण तलाव बांधले जाणार असल्याने नागरिकांची स्वप्नपूर्ती पुढील वर्षी प्रत्यक्षात होणार आहे. या कार्यक्रमाला महापालिकेचे प्रमुख अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *