Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांचा प्लास्टिक हद्दपार करण्याचा वसा…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे.

प्लास्टिकचा कचरा हा राज्यात सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. प्लास्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. माणसाप्रमाणेच प्राणी आणि जलचर यांच्यासोबत सुपीक जमीन नापीक करीत आहे. प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरणप्रेमी आणि ‘राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार श्री.अवधुत सावंत’ हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्लास्टिक होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करून टन च्या हिशोबात प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्या कारवाई करत त्यातून महापालिकेला आर्थिकदृष्ट्या महसूल मिळवून देत अनेक वर्षांपासून लढा देत होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. प्लास्टिक वापरण्याची सवय जुनी असल्याने ती लागलीच सुटणे तसे कठीणचं होते. त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापरण्यावर कारवाई सुरू झाली की, फक्त पिशवी गायब होते.

पण नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याची सवय लागावी, यासाठी ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते ह्या काम करीत आहेत. त्यांच्या या कामात त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेचीही साथ मिळाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘शून्य कचरा’ मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये सोसायटीतून येणारा ओला कचरा व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे ‘ड्राईव्ह’ केले आहेत. त्या ‘ड्राईव्ह’नुसार नागरिक आपल्या घरातील वस्तू आणून महापालिकेकडे जमा करतात. त्यामध्ये घरातील जुने कपडेही गोळा केले जातात. याशिवाय महापालिकेने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रमही सुद्धा सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत घरातील जुने पण वापरण्याजोगे कपडे नागरिकांनी महापालिकेच्या उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीजवळ आणून द्यायचे आहेत. शहरातील गरजू व्यक्ती यातील काही कपडे घेऊन जातात. उर्वरित कपडे महापालिका ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेला देते. या संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते या बचतगटदेखील चालवितात. या बचतगटातील महिला महापालिकेकडून आलेले कपडे धुवून घेतात. त्यांना सॅनिटाईझ केले जाते. त्यानंतर त्या कपड्यापासून कापडी पिशवी बनविली जाते. कापडी पिशवी बनविण्याच्या या उपक्रमामुळे बचतगटातील ४५ महिलांना काम मिळाले आहे. या पिशव्या बाजारात पाच रूपये किंमतीने विकल्या जातात. या महिला महिन्याला १५ हजार पिशव्या तयार करतात. एक पिशवी शिवण्यासाठी त्यांना अडीच रूपये मिळतात. पण जुन्या कपड्याच्या पिशव्या तयार करताना मेहनत जास्त लागत असल्याचे ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते सांगतात.

स्वाती यांचे बालपण मुंबईतील घाटकोपर या परिसरात गेले. त्यांचे शिक्षण हे घाटकोपर येथील मराठा विद्यामंदिर या शाळेत झाले. त्यानंतर ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी झाल्यानंतर त्यांनी लगेचच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचे २००५ मध्ये लग्न झाले आणि त्या कांजूरमार्ग येथे राहायला आल्या. २००८ मध्ये त्या डोंबिवलीकर झाल्या. डोंबिवलीत आल्यानंतर आपोआपच त्या सामाजिक कार्याकडे ओढल्या गेल्या. त्याकाळात बचतगटही मोठ्या जोमात चालत होते. त्यामुळे आपणही बचतगटाची स्थापना करावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार २०१२ मध्ये त्यांनी बचतगटाची स्थापनाही केली. ‘एकता बचतगट’ त्यांनी सर्वप्रथम स्थापन केला. त्यातून अनेक योजना राबवित गेले.

विधवा पेन्शन योजना, महाराष्ट्र घरेलु महिला कामगार नोंदणी असे विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. महाराष्ट्र घरेलु कामगार महिला नोंदणीतून त्यांनी १८०० ते २००० महिलांची नोंदणी केली आहे. २०१६ मध्ये ५५ वर्षांवरील २५० महिलांना त्यांनी दहा-दहा हजार रुपये मिळवून दिले होते. ५६ विधवा महिलांसाठी पेन्शन योजना राबविली होती. तरुण मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये ३०० ते ४०० तरूणांना नोकरी मिळाली. एक बचतगट स्थापन करून स्वाती मोहिते ह्या तेवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी ८० ते ९० बचतगटांची स्थापना केली. त्या बचतगटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली. महिलांना केवळ काम मिळवून दिले नाही तर व्यवसाय उभाह करण्यासाठी लागणारे कर्जही उपलब्ध करून दिले. ब्युटीपार्लर कोर्सचे प्रशिक्षणही महिलांना दिले. ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्था बचतगटाच्या माध्यमातून ज्या कापडी पिशव्या बनवितात त्या फेरीवाल्यांना दिल्या जातात.

या कामात त्यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नवीन कपड्यांच्याही पिशव्या या बचतगटातील महिला बनवितात. त्या पिशव्या दहा रूपयाला बाजारात विकल्या जातात. ‘लॉकडाऊन’च्या काळात घर कामगार महिलांच्या खात्यात सरकारतर्फे दीड हजार रूपये जमा करण्यात येणार होते. ती रक्कम महिलांना मिळावी याकरिता अर्ज भरण्याचे कामही स्वाती यांनी बचतगटांच्या माध्यमातून केले आहे. यामध्ये १८०० महिला लाभार्थी आहेत. त्यापैकी २७५ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. १५० महिलांना त्यांचा लाभही मिळाला आहे. महिला या सक्षम आहेत, त्यांना सबल करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे महिलांना सबल करणे, हेच आमचे पुढील उद्दिष्ट असल्याचे स्वाती मोहिते प्रसिद्धी माध्यमांना सांगतात.

घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या,आपले शहर स्वच्छ राहावे म्हणून स्वच्छतादूत म्हणून काम करणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन्मान देऊन गौरविले आहे. या व्यतिरिक्तही अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. अशा निरलस जनसेवा करणार्‍या आणि महिलांना सबल करण्यासाठी झटणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी ‘राष्ट्रीय पदक’ विजेत्या पत्रकार अवधुत सावंत यांच्याकडून जाहीर रित्या भरभरून शुभेच्छा.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *