आपलं शहर

कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८६ मधील धक्कादायक प्रकार उघड.. गोलवली समता नगर मधील कचरा कुंडीत टाकले जात आहेत वापरलेले पीपीई कीट आणि रुग्णांसाठी वापरलेले साहित्य…

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र (आय) मधील प्रभाग क्र. ८६ गोलवली समता नगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस वापरलेले पीपीई किट्स तसेच रुग्णांसाठी वापरलेले साहित्य टाकले जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून रात्रीच्या अंधारात टाकण्यात येणाऱ्या वस्तुंमुळे परिसरात कोरोना सारख्या संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता स्थानिक नागरीकांत व्यक्त करण्यात येत आहे .

या परिसरातील माजी ग्राम पंचायत सदस्य श्री. भरत जाधव यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार प्रभाग क्षेत्र (आय) मध्ये असलेल्या समता नगर गोलवली वार्ड क्रमांक ८६ मध्ये असलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यात गेली १० ते १५ दिवस रात्रीच्या वेळी अज्ञात कंपनी, रुग्णालय यांनी रुग्णांसाठी वापरलेले पीपीई कीट, हॅन्ड ग्लोव्ह्ज, मास्क, याच बरोबर रुग्णांना वापरून झालेले अन्य साहित्य टाकले जात आहे. या कचऱ्यावर पाळीव तसेच बेवारस कुत्रे, मांजरी यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, हेच प्राणी नागरी वस्ती मध्येही येत असतात अशा गंभीर स्वरुपाच्या प्रकारामुळे परिसरात कोरोना सह अन्य रोगजंतूही पसरण्याची शक्यता आहे. यासाठी या ठिकाणी कोणती अज्ञात व्यक्ती हे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक साहित्य टाकत आहे त्याचा स्थानिक पालिका प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेनेही शोध घेउन संबंधीतांवर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून होऊ लागली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *