Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कळी तर फुलणारचं आहे फक्त तिला मोकळा श्वास घेत फुलता येईल, असे वातावरण सभोवताली असू द्या !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

११ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ म्हणून साजरा केला जातो. माणसाच्या समाजव्यवस्थेचा गाडा स्त्री-पुरुष या दोन्ही समान चाकांवरच चालतो आहे, हे तर सत्य आहे. मात्र, जगभरात, अनेक ठिकाणी पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने स्त्रिया – मुलींना दुय्यम स्थान देण्यात आलं. जवळपास सगळीकडे स्त्रिया-मुलींना आपल्या सुखांसाठी, मूलभूत हक्कांसाठी, कधीकधी तर आपल्या अस्तित्वासाठीही लढा द्यावा लागला. समाज जसजसा सुसंस्कृत होत गेला, तसंतशी स्त्री-मुलगी मुलग्याइतकीच महत्वाची आहे, तिलाही समान हक्क, न्याय्य अधिकार मिळायला हवेत, असा विचार पुढे येत गेला. मात्र, सगळीकडे अजूनही हा विचार म्हणावा तेवढा रुजलेला नाही. आणि म्हणूनच, जागतिक बालिका दिन साजरा करुन, आपल्याला मुलींच्या अस्तित्वाविषयी, लैंगिक समानता, समान संधी आणि समान न्यायाविषयी लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

मुलींना दुय्यम किंवा ओझे मानण्याचा सर्वात भीषण परिणाम म्हणजे स्त्री-भ्रूण हत्या. मुलग्याच्या हव्यासापोटी आणि अज्ञानातून आईच्या पोटात असलेल्या मुलींची हत्या करण्याची अधर्म आणि क्रूर प्रथा सर्वात जास्त भारतातच आढळते. पण, चीन, पाकिस्तान, काही अरब देश, आफ्रिका आणि अगदी ऑस्ट्रेलियातल्या काही टोळ्यांमध्येही ही पद्धत होती. ही क्रूरता बंद करण्यासाठी, सरकारने गर्भजल परीक्षण आणि अशा गर्भपातांवर कायद्याने बंदी घातली असली, तरीही दुर्दैवाने आजही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीनं स्त्री-भ्रूणहत्या सुरुच आहे. आणखी वाईट म्हणजे, जीव वाचवण्याची शपथ घेणारे डॉक्टरच थोड्या पैशांसाठी अशा हत्या करतात. एकही स्त्री-भ्रूण मारले जाणार नाही अशी व्यवस्था निर्माण होईपर्यंत आपण प्रयत्न करत राहायलाच हवं.

आणखी एक समस्या म्हणजे, बालिकांवर अजाणत्या वयात होणारे विनयभंग, चुकीचे स्पर्श. ही विकृती संपवण्यासाठी समाजप्रबोधन, कायद्याचा धाक आणि त्यासोबतच मुलींचे समुपदेशन करुन, त्यांना या संदर्भात जागृत करणे, गैरप्रकार सहन न करता त्याविषयी मोठ्या माणसांना माहिती देण्याची समज आणि हिंमत देणे, यावर अनेक समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्या, सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवर काम करत आहेत. काही ठिकाणी बालिकांना घरगुती हिंसाचार, पिळवणुकीचाही सामना करावा लागतो. शरीरीक अत्याचार सहन करावे लागू नये यासाठी मुलींना लहानपणापासूनच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत, स्वसंरक्षणासाठी कुस्ती, मुष्टियुद्ध, कराटेसारख्या युद्धकलांचे प्रशिक्षण हे द्यायलाच हवे. ग्रामीण भागात आणि शहरातही बलिकांना घरच्या जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी शाळांमध्ये शौचालये नसतात किंवा,पाळी सुरु झाल्यावर मुलींना शाळेत येता येत नाही. मात्र ही परिस्थिती आता खूपच सुधारली असून त्यामुळे शिक्षणात मुलींचे प्रमाण ग्रामीण भागातही वाढलेले दिसते आहे. घरोघरी नळ पोहचत असल्याने, लांबवरून पाणी आणण्याचे मुलींचे कष्टही कमी होत आहेत.

बालिकांच्या बाबतीत आणखी एक मोठी समस्या म्हणजे, त्यांच्या आहाराकडे केले जाणारे दुर्लक्ष. ही समस्या केवळ कुपोषित, ग्रामीण, आदिवासी भागातच आढळते असे नाही, तर शहरी मध्यमवर्गीय घरातही बालिकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. वाढत्या वयात, पाळी सुरु झाल्यावर मुलींची जी शारीरिक झीज होते. ती भरून काढण्यासाठी त्यांनी योग्य तो पोषक आहार घेणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यांना योग्य प्रमाणात लोह, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्व मिळायलाच हवीत. मात्र दुर्दैवाने याही बाबतीत, मुलांना जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे लक्ष मुलींकडे दिले जात नाही. विशेषतः मुलींना व्यायामची गरजच नाही, असा एक गैरसमज आपल्या समाजात आहे, तो दूर करायला हवा. यासाठी सरकारी पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर देखील व्यापक काम करण्याची गरज आहे.

यंदाचा जागतिक बालिका दिन, विशेष आहे. बरोबर दहा वर्षांपूर्वी ह्या दिनाची सुरुवात झाली होती. या दशकभरात, आपण बालिकांच्या हक्कांसासाठी, त्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणि आनंद आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून काय साध्य झाले, याचे सिंहावलोकन करण्याची हो योग्य वेळ आहे. मुली आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्य आणतात, खूप आनंद आणि समृद्धी आणतात. त्यांच्यामुळे जगात सौन्दर्य आहे, गोडवा आहे, सृजन आहे. मात्र, बुरसटलेले विचार आणि कुप्रथा यांना बळी पडून आपण आजवर, या सुंदर कळ्यांवर खूप अन्याय केला आहे. हसण्या-खेळण्याच्या, फुलण्याच्या वयात, त्यांना अनेक छोट्या-मोठ्या संघर्षांचा सामना करावा लागतो. क्षमता असूनही अनेक संधी हातातून निघून जातात, चाकोरीत अडकलेले आयुष्य जगावे लागते. यात त्यांची अनावश्यक शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक झीज होते, जी आपल्याला टाळता येऊ शकेल. स्त्रीला संधी आणि स्वातंत्र्याचे पंख दिले तर ती किती भरारी घेऊ शकेल, हे अनेक स्त्रियांनी दाखवून दिले आहे. तिच्यात उपजतच ताकद आहे, लवचिकता आहे. निसर्गाने स्त्री हे रसायन अत्यंत चिवट आणि जीवट असे बनवले आहे. गरज आहे, ती त्यांना समानता आणि संधी देण्याची. त्याची जबाबदारी शासन, प्रशासन, समाज आणि कुटुंबसंस्था या सगळ्यांनी समानतेने सांभाळली पाहिजे. केवळ एक दिवस जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन, त्यांचे कौतूक करणे पुरेसे नाही, तर हा सन्मान, समानता आणि संधी त्यांना नैसर्गिकरित्याच मिळेल, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत, असा समाज निर्माण करणे, ही आपली जबाबदारी आहे. जागतिक बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *