Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सामाजिक संघटनांची आघाडी ही काळाची गरज: पुरोगामी संघटना स्नेहमेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्याप्रमाणे देशाच्या राजकारणात आजच्या घडीला लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकीय आघाडी शिवाय पर्याय राहिलेला नाही त्याचप्रमाणे देशातील धर्मांधतेच्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज झालेली आहे. या देशात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सर्व पुरोगामी, समविचारी संघटनांनी एकत्र येवून काम करण्याची अत्यावश्यकता निर्माण झालेली आहे, असे मत डॉ. हमीद दाभोलकर यांनी डोंबिवली येथे पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना काढले.आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात समाजातील सर्व पुरोगामी संघटनांची आघाडी उभी करण्यासाठी प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त करीत त्यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रा. प्रवीण देशमुख हे व्हीजेटीआय या जगप्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयातून ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. या निवृत्त पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. प्रवीण देशमुख यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक लाखाचा धनादेश डॉ. हमिद दाभोळकर यांच्या हस्ते सुपूर्द केला.

रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणी राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील ठाकूर हॉल येथे विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सतत कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा प्रवीण देशमुख यांच्या निवृत्ती पूर्व सोहळ्याच्या निमित्ताने पुरोगामी संघटनांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यात राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ.हमीद दाभोळकर, लोकभारती चे राज्य अध्यक्ष श्री अशोक बेलसरे हे प्रमुख वक्ते उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी प्रा. प्रवीण देशमुख यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकारणासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा सर्वत्र कटुता निर्माण झालेली आहे ही खंत व्यक्त केली. सामाजिक क्षेत्रात पुरोगामी म्हणवणाऱ्या संघटनांमध्ये सुद्धा अंतर्गत दुहीचे बीज पाहायला मिळते आहे.

प्रा. प्रविण देशमुख हे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग चे तज्ञ आहेत. ज्या प्रमाणे ते विविध रंगाच्या धाग्यांना एकत्रितपणे गुंफून सुंदर वस्त्र विणतात त्याचप्रमाणे आपल्या दीर्घ सामाजिक-राजकीय अनुभवाच्या जोरावर सामाजिक संघटना मधल्या कटुता दूर करून, सर्व पुरोगामी संघटनांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अनेक जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या शिबिरांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वाटचाल सुरू केली याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. राष्ट्र सेवा दल ते पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उद्योजक आणि पुन्हा राष्ट्र सेवा दल असा त्यांचा प्रवास त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात उलगडून सांगितला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून आणि त्यामागील विज्ञान उलगडून सांगून तसेच गायन विशारद शालिनी मेखा यांनी सादर केलेल्या ‘खरा तो एकचि धर्म’ या गाण्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर आकाश पवार आणि साथींनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी ज्वलंत विषयांवरील अनेक गाणी दमदारपणे सादर केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे यांनी या स्नेह मेळाव्या मागची पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविकात मांडली.

सेवानिवृत्तीनिमित्त केवळ माझा सत्कार न करता या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व पुरोगामी विचारांच्या, समविचारी संघटनांच्‍या साथींना एकत्र करण्याची संकल्पना प्रा. प्रवीण देशमुख यांनी सुचविली. समाजातील अनेक विषयांवर, अनेक संघटना आपापल्या परीने कार्य करीत असतात, परंतु त्यांचा एकमेकांशी संवादच नसतो. आपण जे काही करतो, ते आपलेच कार्य आहे इतर कोणी त्यामध्ये सहभागी होणार नाही किंवा होऊ नये अशा प्रकारची मानसिकता दृढ झालेली दिसते. त्यामुळे त्या संघटनांचे, संस्थांचे विचार समाजामध्ये तेवढ्या प्रभावीपणे पुढे जातांना दीसत नाही आणि ही विचार करायला चिंता करायला लावणारी ही बाब श्री.अशोक वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात अधोरेखित केली.

‘मी म्हणजेच संघटना’ ही प्रवृत्ती संघटनेच्या वाढीला अडथळा ठरते आहे. एखादी सामाजिक समस्या म्हणजे केवळ माझीच समस्या आणि त्याला मीच सोडविणार हा अट्टाहासामुळेही सामाजिक संघटनांमधील अंतर्गत कटुता वाढीला लागलेली आहे..!
सर्वच संघटनांना थोडा-अधिक प्रमाणात या ‘मी’ पणाने ग्रासलेले आहे. या ‘मी’ पणा मुळेच चळवळ आणि विचार पुढे जात नाही आणि हे पुरोगामी विचारांच, विवेकाचं लक्षण नव्हे, यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आहे, अशी भूमिका प्रा.प्रवीण देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना मांडली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विवेकशील विचारांनी मागील ३२ वर्ष कार्य करीत आहे तर राष्ट्र सेवा दल ८० पेक्षा जास्त वर्षांहून साने गुरुजींच्या ‘जगाला प्रेम अर्पावे’ या विचाराने कार्यरत आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या दोन संस्थांनी समाजातील अनेक विखुरलेल्या संस्था आणि संघटनांना एकत्रित आणण्याचं दायित्व स्वीकारायलाच हवं असे ठाम मत प्रा.प्रवीण देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलं. आणि याच भावनेतून या कार्यक्रमाची आखणी केली गेली. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीं व पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. यामध्ये व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी पी. काकड उपाध्यक्ष गोपाळ धारपवार, प्राचार्य राम नेमाडे यांच्यासह, ख्रिश्चन असोसिएशन, साउथ इंडियन असोसिएशन, रोटरी क्लब, महिला मुक्ती संघटना, श्रमिक दल अश्या विविध क्षेत्रात, सामाजिक घटकात काम करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचाच याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता, लोकमत, स्थानिक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यासह अनेक पत्रकार मित्र, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिक्षण मंडळाचे सदस्य व ठाणे जिल्हा लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रमेश दिनकर, माजी नगरसेवक आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे कार्याध्यक्ष श्री.नंदू मालवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री.युवराज पवार, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव मस्के, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज असरोंडकर यांच्यासह शिवसेना, मनसे या पक्षांचे अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. या स्नेहमेळावाच्या आयोजनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तसेच राष्ट्रसेवा दलाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, हा स्नेहमेळावा यशस्वी व्हावा याकरता प्रयत्न केले.

शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ आणि साने गुरुजींच्या,’जगाला प्रेम अर्पूया!’ या विचारांना नमन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा.वृषाली विनायक यांनी अतिशय चोखपणे पार पडली तर राष्ट्र सेवा दलाच्या सौ.कल्पना शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री.अशोक वानखेडे, राष्ट्र सेवा दलाचे कल्याण-डोंबिवली जिल्हा मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश चिंचोले, सल्लागार मंडळ सदस्य डॉ. श्यामकांत जाधव, वंदना ताई शिंदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी किरणताई जाधव, श्रीप्रसाद खुळे, राजू कोळी, जगदिश संदानशीव, यांच्यासह श्री.सचिन शिर्के, सौ.सुरेखा देशमुख, अक्षिता पाटील, छाया शिर्के, राजेंद्र कोळी, डी. जे. वाघमारे, बापू राऊत, नितीन सेठ, बबन सोनवणे, डॉक्टर नितीन जोशी, डॉ.दुष्यंत भादलीकर, सौ.संध्या देशमुख, श्री.नागले सर, साक्षी डोळस इत्यादी साथीनी परिश्रम घेतले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *