Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उपायुक्तांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला दिली धमकी; ‘शिंदे गटात न आल्यास एन्काउंटर करेन’..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी न झाल्यास एन्काउंटर करण्याची धमकी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे. नवी मुंबई – परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असून, १० लाखाची खंडणी मागत असल्याचा तसेच एन्काउंटर करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप माजी शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे.

मढवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. मढवी यांच्या या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि एम.के.मढवी यांच्या पत्नी विनया मढवी यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, माझ्यावर वेगवेगळे गुन्हे नोंदवले जात असून, माझ्या विरोधात महिलांना पुढे करत विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. २० जूनपासून हा सगळा त्रास मला व माझ्या कुटुंबाला दिला जात आहे. झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे मला विजय चौगुलेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकत असून, हे सगळे सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. मात्र मी उद्धव साहेबांची शिवसेना सोडणार नाही. हा सगळा त्रास असाच सुरू राहिला तर उपायुक्त विवेक पानसरेंच्या कार्यालयासमोर मी व माझे कुटुंब सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा मढवी यांनी बोलताना दिला आहे. आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे, संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असतील असे मढवी यांनी म्हटले आहे. उपायुक्त विवेक पानसरेंविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील मढवी म्हणाले.

उपायुक्त पानसरे म्हणाले, आरोप खोटे :

उपायुक्त विवेक पानसरे यांनी मात्र मढवी यांचे आरोप फेटाळले असून, हद्दपारीच्या भीतीपोटी मढवी बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. मढवी यांच्यावर दखल आणि अदखलपात्र असे मिळून १३ गुन्हे दाखल असून त्यांच्या तडीपारीची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली :

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एम.के.मढवी धमकी प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. राज्यात सध्या बीन पैशाचा तमाशा सुरू आहे. राज्यासमोर महागाई, बेरोजगारी सारखे अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय आकसापोटी शिवसैनिकांना धमक्या देण्यात, त्यांची झुणका भाकर केंद्र, पोळी भाजी केंद्र बंद पाडण्यात व्यस्त असून, शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे खासदार म्हणाले. मढवी कुटुंब लोकांची कामे करतात म्हणून त्यांना नगरसेवकपदाच्या दोन तीन टर्म मिळाल्या असल्याचे सांगत, शिवसेना मढवी कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याचे खासदार राजन विचारे म्हणाले. मढवी धमकी प्रकरण हे गंभीर असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते बदनाम होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असे देखील खासदार विचारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *