Latest News आपलं शहर

“ग्रीन कॉरीडॉर मोहीम” राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोड ते मुंबई विमानतळ येथे विनाअडथळा पेशंटला सुखरुप पोहचविले! काशीमिरा वाहतूक पोलिसांची कामगिरी!

मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील वॉकहार्ड हॉस्पीटल येथून एका गंभीर आजारी पेशंटला फुप्फुसांच्या उपचारासाठी पवनहंस विलेपार्ले विमानतळावरुन हैदराबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवायचे होते. हॉस्पीटल प्रशासन तसेच पेशंटचे नातेवाईक यांनी रुग्णवाहिकेने विनाअडथळा पेशंट सुखरुप पाठविण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे यांचेशी आज 2 एप्रिल रोजी सकाळी ०७.३५ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता वाहतूक पोलीसांनी सदर रुग्णवाहिका योग्य त्या बंदोबस्तात पायलट वाहनाच्या मदतीने कोठेही ट्राफीक जॅममध्ये अडकणार नाही व रुग्णवाहिकेला पूर्ण रस्ता मोकळा मिळेल याची खबरदारी घेतली. पोलीसांनी ग्रीन कॉरीडॉर मोहीम राबवून अवघ्या ३५ मिनीटांत मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पीटल पासून ते मुंबईच्या विलेपार्ले पवनहंस विमानतळ येथे अंबुलन्सने विनाअडथळा पेशंट सुखरुप पोहचविले.

ग्रीन कॉरीडॉर मोहीम, यशस्वी होण्यासाठी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मिरारोड ते विलेपार्ले यादरम्यान वाहतूक बंदोबस्त लावून घेण्यात आला. त्यांनतर वाहतूक शाखेच्या पायलेटींग कार सोबत सकाळी ०९.१० वाजता ही रुग्णवाहिका वोकार्ड हॉस्पिटल मिरारोड येथून निघून ०९.१७ वाजता रुग्णवाहिकेने दहीसर टोलनाका पार केला व पवनहंस विलेपाले विमानतळावर ०९.४५ वाजता पेशंटला घेऊन सुखरुप पोहचली. वाहतूक पोलीसांनी वोकार्ड हॉस्पिटल, मिरारोड ते विमानतळ केवळ ३५ मिनीटात पेशंटला सुखरूप पोहचवले. पेशंट १०.०५ वा. एअर एम्बुलेन्सने रवाना होऊन ११.४० वाजता हैद्राबादला बागमपेठ विमानतळावर पोहचले.

मिरा भाईंदर शहरात प्रथमच ग्रीन कोरीडोर मोहीम यशस्वी पद्धतीने हाताळल्याबद्दल मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त सदानंद दाते, रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, डी.सी.पी मंजुनाथ, CSO जुहू एअरपोर्ट पवार, सांताक्रुजचे पोलिस निरीक्षक घानोरे यांचे आभार मानले तसेच सुर्यकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक), रमेश भामे पोलीस निरीक्षक (वाहतूक) तसेच वाहतूक अंमलदार, वाहतूक शाखा मिरा-भाईंदर यांचे विशेष कौतुक केले आहे.

या प्रसंगी वोकहार्ड रुग्णालयाचे डॉ. निलेश सिंग, डॉ. बिपीन व त्यांच्या संपूर्ण टीम नें फार मोलाची जबाबदारी पार पाडली असे मत मा. आमदारांनी यावेळी व्यक्त केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *