Latest News आपलं शहर

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशनचा सल्ला देऊ नका! केडीएमसी चे डॉक्टरांना निर्देश

अवधुत सावंत, कल्याण / डोंबिवली प्रतिनिधी : लक्षणं असणाऱ्या आणि सहव्याधी (इतर आजार) असलेल्या वृद्ध रुग्णांना डॉक्टरांनी घरच्या घरी विलगीकरणाचा (Home Quarantine & Isolation) सल्ला न देण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. असे गृह विलगिकरणात (Home Isolation) असणारे रुग्ण गंभीर होऊन ते दगावण्याच्या शक्यतेमुळे खासगी डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याचे निर्देश केडीएमसी प्रशासनाने दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांचे निदान लवकर होऊन, त्यांना त्वरित उपचार मिळण्यासाठी तापाच्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट केली जाते. काही व्यावसायिक सहव्याधी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन हे होम आयसोलेशन त्यांच्या जीववरही बेतू शकते. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी होम आयसोलेशन (Home Isolation) चा सल्ला न देण्याबाबतची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बजाविण्यात आली आहे.

तर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पालिकेतर्फे देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. साधा ताप आला तरी नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापाची औषधे आणि गोळ्य़ा घेतात. अशा रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली असल्यास उपचार मिळण्यास विलंब होण्यासह अन्य व्यक्तींनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देऊ नयेत, औषध विक्रेत्यांनी डॉक्टरचे नाव, पदनाम, रुग्णाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राला देण्याचे औषध विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. एखाद्या औषध विक्रेत्याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्याचे आढळून आल्यास अन्न- औषध प्रशासनाच्या(food and drug) सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध विक्रेत्यांना देण्यात आला आहे..

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *