Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

शिंदे गट-शिवसेनेचा कलगीतुरा रंगणार; दसरा मेळाव्यावरून ‘महाभारत’ सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरुद्ध दंड थोपटले असून दोन्ही नेते दसरा मेळावा मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नाहीत. सध्या दसरा मेळावा कुणी घ्यायचा? नेमका हा वाद उच्चन्यायालयाच्या दरबारी पोहचला असून उद्या यावर सुनावणी होणार आहे. यावरच अधूनमधून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर शरसंधान सोडताना दिसत आहे त्यामुळे वातावरण कमालीचे तापलेले आहे. युवासेनेचे शरद कोळी यांनी येत्या दसऱ्याला शिवसेनेला शिवतीर्थ न मिळाल्यास रामायण महाभारत घडून येईल, असे भाष्य केले आहे. त्यामुळे नेमका हा मुद्दा कुठल्या वळणावर जात आहे, याचा अंदाज लावता येतो.

सध्या शिंदे गटाला बीकेसी मध्ये असलेले एमएमआरडीएचे मैदान मिळाले असून, उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावरच घेण्यात येईल जर इथे सील लावले गेले तर ते तोडून टाकण्यात येईल अशी धमकीवजा सूचनाच दिली आहे. दरवर्षी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून शिवसेनाप्रेमी व कार्यकर्ते दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येत एकत्र येत असतात त्यामुळे यंदा दसरा मेळावा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेवर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच शैलीत उत्तर दिले आहे, यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की तोडफोड व घुसखोरी करत सभा घेतल्या जात नसतात त्यामुळे जर कोणी असा प्रयत्न करेल तर राज्यातील सुरक्षा यंत्रणा त्यांना रोखण्याकरिता सज्ज असेल. दरम्यान दसरा मेळावा मुद्द्यावरून रामायण महाभारताची भाषा करणारे शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याचे चित्र बघता दोन्ही गट आक्रमक असल्याने राडा सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राज्याच्या शांतता व सुव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी असल्याने ते शेवटी नरमाईचे धोरण अवलंबतील हे देखील सत्य आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *