Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भारताच्या स्वदेशी विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे पुण्यात उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात केपीआयटी तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ने विकसित केलेली भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशी बनावटीच्या, पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांना सांगितले की, आत्मनिर्भर म्हणजे परवडण्याजोगी आणि सहजपणे उपलब्ध स्वच्छ ऊर्जा, हवामान बदलाची उद्दिष्टे साध्य करणे, नवीन उद्योजक आणि नोकऱ्या निर्माण करणे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हायड्रोजन व्हिजन भारतासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हरित हायड्रोजन हे एक उत्कृष्ट तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मिती माध्यम आहे जे रिफायनिंग उद्योग, खत उद्योग, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग आणि अवजड व्यावसायिक वाहतूक क्षेत्रातील वायू उत्सर्जनातून निघणाऱा कार्बन कमी करण्याचे कार्य करते.

हायड्रोजन फ्युएल सेल बस

डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून बस चालण्यासाठी आवश्यक वीज निर्माण करते आणि बसमधून बाहेर टाकला जाणारा घटक केवळ पाणी आहे, त्यामुळे ही बस पर्यावरणास अनुकूल असे वाहतुकीचे माध्यम आहे. तुलनात्मक दृष्ट्या पाहता, लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणारी एकच डिझेल बस सर्व सामान्यरित्या वर्ष भरात १०० टन कार्बन डाय-ऑक्साईड उत्सर्जित करते आणि भारतात अशा दहा लाखांहून अधिक बस आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इंधन सेल वाहनांची उच्च कार्यक्षमता आणि हायड्रोजनची उच्च ऊर्जा घनता हे सुनिश्चित करते की इंधन सेल ट्रक आणि बसेससाठी रुपये प्रति किलोमीटरचा परिचालन खर्च डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी आहे. यामुळे भारतात मालवाहतूक क्रांती होऊ शकते. शिवाय, इंधन सेल वाहने शून्य ग्रीन-हाऊस गॅस उत्सर्जनाची देखील हमी देतात. मंत्री महोदयांनी केपीआयटी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या संयुक्त विकास प्रयत्नांचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील पराक्रम जगातील सर्वोत्कृष्ट असून कमी खर्चिक असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

भारतासाठी हायड्रोजनचे महत्त्व लक्षात घेता १५ ऑगस्ट २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे बाबत केलेल्या घोषणेची आठवण डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी करून दिली. त्यांनी भारतातील शास्त्रज्ञांना भारताच्या हायड्रोजन मोहिमेसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करण्याचे आवाहन केले. मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की, नजीकच्या काळात हायड्रोजन इंधनाचे महत्व वाढेल कारण भारतातील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक ही रस्ते मार्गाने होते ज्यात मोठ्या प्रमाणात अवजड व्यावसायिक वाहनांचा वापर केला जातो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, सुमारे १२-१४% कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन आणि सूक्ष्मकणांचे उत्सर्जन डिझेलवर चालणार्‍या अवजड व्यावसायिक वाहनांमधून होते आणि हे विकेंद्रित स्वरूपाचे उत्सर्जन असल्या कारणाने आहेत ते थांबवणे कठीण आहे. मंत्री म्हणाले, या क्षेत्रात हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने रस्त्यावरून होणारे उत्सर्जन दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम प्रदान करतात. ते म्हणाले, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अंतर्देशीय जलमार्ग वाढवण्याचेही भारताचे ध्येय आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी निष्कर्ष काढला की, ही उद्दिष्टे साध्य करून, भारत जीवाश्म ऊर्जेचा निव्वळ आयातदार होण्यापासून ते स्वच्छ हायड्रोजन उर्जेचा निव्वळ निर्यातदार होण्यापर्यंत मोठी झेप घेऊ शकतो आणि अशा प्रकारे, एक प्रमुख हरित हायड्रोजन उत्पादक आणि हरित हायड्रोजन संबंधित उपकरणांचा पुरवठादार बनून हायड्रोजनच्या बाजारपेठेत भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करू शकतो. नंतर, डॉ जितेंद्र सिंह यांनी (सीएसआयआर-एनसीएल) मधील बिस्फेनॉल या प्रायोगिक तत्वावर चालणाऱ्या (पायलट) सयंत्राचे उद्घाटन केले आणि सांगितले की,या नव्या संयंत्रामुळे सीएसआयआर च्या कोरोना मोहीम आणि बल्क केमिकल्स उत्सर्जन कार्यक्रमाअंतर्गत एनसीएल ने विकसित केलेल्या नवीन प्रक्रिया तंत्रज्ञानाचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक केले आहे.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, बिस्फेनॉल-ए (बीपीए) हे इपॉक्सी रेजिन, पॉली कार्बोनेट आणि इतर अभियांत्रिकी प्लास्टिकच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा कच्चामाल ठरू शकते. ते म्हणाले, वर्ष २०२७ पर्यंत बिस्फेनॉल-ए ची जागतिक बाजारपेठेतली मागणी ७.१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, २०२०-२७ या कालावधीचे विश्लेषण करता, २% ने सीएजीआर वाढेल. भारतातील एकूण अंदाजे वार्षिक मागणी १ लाख ३५ हजार टन एवढी असून आज ती आयात केली जाते. सीएसआयआर-एनसीएलच्या तंत्रज्ञानामुळे या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या आयातीला पर्याय शक्य होईल आणि भारताच्या आत्मनिर्भर उपक्रमाला मदत होईल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.

सीएसआयआर-एनसीएल ने विकसित केलेल्या प्रक्रियेचे वेगळेपण म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानाला जागतिक मापदंडासह स्पर्धात्मक बनवणारे हे एक नवीन प्रकारचे तंत्रज्ञान आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *