Latest News गुन्हे जगत देश-विदेश महाराष्ट्र

डोंबिवलीत सेक्स रॅकेट चा पर्दाफाश; चार युवतींची दलालांच्या तावडीतून सुटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथील एका लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या कारवाईत चौघा तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

लॉजिंग वर आधी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम केली खात्री

डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीत हॉटेल विराज साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची गुप्त बातमी मिळताच ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक तेथे छापा टाकला. यावेळी चार तरुणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या.

सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत, शिवाय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध ‘बालाजी मंदिर’ परिसरात चालणाऱ्या या सेक्स रॅकेटचा ‘अँटी ह्युमन ट्रॅफिक सेल’चे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाने पर्दाफाश केला. साईराज उर्फ विराज लॉजिंग बोर्डींगमध्ये अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसायाचा घृणास्पद प्रकार चालू होता याची पोलिसांना गुप्तरीत्या बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर लॉजमध्ये पोलिसांकडून आधी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री करण्यात आली.

तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी

पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकासह टिळकनगर पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच या लॉजमधील साऱ्यांची भंबेरी उडाली. पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून ४ तरुणींची सुटका केली. तर या कांडातून मुक्त करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली.टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या विरोधात ३७६ (२), ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे टिळकनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.

डोंबिवलीसारख्या सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीमध्ये अशाप्रकारे सुरू असलेल्या देहव्यापाराकडे या परिसरातील पोलीस दुर्लक्ष का करतात ? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *