Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत रंगले शह काटशहचे राजकारण!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: सोमवार 26 जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून उपायुक्त मुख्यालय अजित मुठे यांचेकडून अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचे ऐवजी आता अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रतिनियुक्तीवर असलेले उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांचेकडे सोपविण्यात आला आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या प्रभाग चारच्या सहायक आयुक्त कांचना गायकवाड यांच्याकडे वृक्ष अधिकारी सोबतच सहायक आयुक्त उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वाहन विभागाचे सहायक आयुक्त सचिन बच्छाव यांचेकडे मूळ कार्यभार सांभाळून वैद्यकीय आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्याच बरोबर सर्वात मोठी आणि चर्चित बदली सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची ठरली आहे कारण दीपक खांबीत यांची बदली करण्यासाठी खुद्द मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांचेवर राजकीय दबाव आणला होता अशी चर्चा त्यावेळी केली जात होती. दीपक खांबीत यांना आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार देण्यात आला असून त्यांचे ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना पूर्ववत पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

तीन महिन्यापूर्वीच आयएएस (IAS) असलेले आयुक्त डॉ. विजय राठोड या तडफदार अधिकाऱ्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे काही वादग्रस्त अधिकारी जे वर्षानुवर्षे एकाच विभागात एकाच पदावर चिटकून बसलेले होते त्यांच्या बदल्या करण्याचे धाडस केले होते. मात्र केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच आत्ताचे आयुक्त दिलीप ढोले यांनी या अधिकाऱ्यांना पुन्हा त्यांच्या पूर्व पदावर बसवले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या त्यानंतर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी देखील तडकाफडकी बदली करण्यात आली असून यामध्ये पक्षांचे राजकारण तर आहेच शिवाय मोठे अर्थकारण देखील गुंतले असल्याने ह्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व अधिकाऱ्यांच्या गेल्या काही महिन्यातच झालेल्या या बदल्या पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याने मिरा भाईंदर शहरात सत्ताधारी भाजप आणि राज्यात सत्तेत असलेले मात्र शहरात विरोधीपक्षात असलेल्या शिवसेनेत पुन्हा एकदा शह कट शहचे राजकारण रंगले असल्याची चर्चा केली जात आहे. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची मूळ विभागात बदली झाल्यामुळे आमदार गीता जैन यांना मात्र मोठा धक्का बसला असल्याची चर्चा केली जात आहे. कारण दीपक खांबीत माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या बोलण्यानुसार कामकाज करीत होते आणि आमदार असून देखील त्यांनी गीता जैन यांच्याशी संबधित असलेल्या काही ठेकेदारांची काही कामं अडवून धरली होती आणि त्यामुळेच आमदार गीता जैन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची बदली करण्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती असे बोलले जात होते.

मिरा भाईंदर शहरातील मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरलेली व कर्जबाजारी झालेली महानगरपालिका, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शहरात असुविधांचा बाजार मांडला असताना या सर्व शह काट शहच्या राजकारणात मिरा भाईंदर शहरातील करदात्या जनतेला मात्र कुणी वाली राहिला नसल्याचे दिसत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *