Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

बँक कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाला आळा बसवण्यासाठी बँक ग्राहकांना आरबीआयचे कवच..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील प्रमुख व केंद्रस्थानी असणारी रिझर्व बँक (आरबीआय) सर्व बँकांचे नियमन व नियंत्रण करते. आर्थिक व्यवहार करताना सर्व बँकांना आरबीआयच्या दिशानिर्देशानुसार कार्य करणे आवश्यक व बंधनकारक असते. त्यामुळे बँकिंग प्रणाली सुरळीत ठेवण्यासोबत ग्राहकांच्या (खातेधारकांच्या) हितांना देखील आरबीआय मार्फत प्राधान्य दिले जाते. अनेकदा असे होते की, आपण बँकेमध्ये गेले असता संबंधित बँक कर्मचारी कामाची टाळाटाळ करताना दिसतात अथवा गैरवर्तन करतात. यामुळे ग्राहकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.

बँक कर्मचाऱ्यांद्वारे कामात केली जाणारी दिरंगाई, टाळाटाळीची उत्तरे देणे, जेवणाची वेळ आहे सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवणे, गैरवर्तन इत्यादी बाबी रोखण्याकरिता आरबीआयने ग्राहकांना काही अधिकार दिले आहेत. कुठल्याही ग्राहकांसोबत संबंधित बँकेत गैरव्यवहार झाल्यास या अधिकाराचा वापर करत बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते.

जर आपल्यासोबत बँक कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केले असल्यास थेट आपण आरबीआयकडे तक्रार नोंदवित समस्येचे निवारण करू शकता, याकरिता आपणाला बँकिंग लोकपालकडे संपूर्ण घडलेल्या प्रकरणाची माहिती सादर करावी लागेल. अशा बँक कर्मचाऱ्यांवर आरबीआय तातडीने कारवाईची हमी ग्राहकांना देते.

जर बँक कर्मचारी हलगर्जीपणामुळे आपणाला नाहक त्रास देत असेल तर सर्वप्रथम आपण बँकेच्या नोडल अधिकाऱ्याजवळ तक्रार नोंदविली पाहिजे किंवा संबंधित बँकेच्या तक्रार मंचकडे सुद्धा याची माहिती सादर केल्यास समस्येचे निवारण केल्या जाते. संबंधित बँकेच्या तक्रार निवारणाच्या टोल फ्री क्रमांकावर देखील ग्राहक त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

जर आपणाला बँकिंग लोकपालकडे तक्रार द्यावयाची असेल तर आपण फोनद्वारे अथवा ऑनलाईनच्या माध्यमाने तक्रारीची नोंद करू शकता. बँकिंगसंबंधी तक्रार निवारणाकरिता टोल फ्री क्रमांक १४४४८ हा आहे. जर आपण ऑनलाईन तक्रार नोंदवण्यास इच्छुक असाल तर <https://cms.rbi.org.in> या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करून आपली समस्या नोंदवू शकता.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *