Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रामाणिक जवानाचा आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मैदानात मिळालेली दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन पोलीसांना सुपूर्द करणारे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी केदार यांचा सत्कार 21 मार्च रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 18 मार्च 2023 रोजी मिरारोड पूर्वेकडील एस. के. स्टोन येथील मैदानात बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दर्शनाकरिता मिरा भाईंदर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अनेक जवान देखील तैनात करण्यात आले होते. त्यापैकी एक जवान शिवाजी केदार हे देखील सुरक्षिततेसाठी तैनात असताना त्यांना सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारे गर्दीच्या ठिकाणी जमीनीवर पडलेली अंदाजे 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन मिळाली.

2 लाख रुपये किमतीची ही मिळालेली सोन्याची चैन महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी केदार यांनी प्रामाणिकपणे व तातडीने मिरारोड येथील कानाकीय पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या ताब्यात दिली.

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवनाने अशा प्रकारे प्रामाणिकपणा दाखवून दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन परत केली म्हणून मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांचा सत्कार केला.

मिरारोड पूर्वेकडील एस. स्टोन मैदानात 18 व 19 मार्च हे दोन दिवस बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आमदार गीता जैन आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. बागेश्वर धामचे धर्मगुरू धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दर्शनाकरिता मिरा भाईंदर शहरा बरोबरच देशातील अनेक शहरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

कार्यक्रमाच्या दोन दिवसांत या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील बांवरीया गँगच्या टोळीतील 50 ते 60 महिलांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी 35 ते 40 महिलांच्या गळ्यातील अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशा वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचा आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्यामुळे सर्व स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *