Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढून दाखवा – नामदार दादाजी भुसे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदूगर्वगर्जनेच्या माध्यमातून शिंदे गटाने डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील दावडी-रिजेन्सी येथील पाटीदार भवन सभागृहात शिवसेनेचे कल्याण लोकसभा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सगळे माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री नामदार श्री. दादासाहेब भुसे होते.

बाळासाहेबांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे शिंदे गटाला मज्जाव करत असल्याने उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढुन निवडणूक लढवून दाखवा असे आवाहन बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. शिंदे गटाच्या वतीने डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना शिवसेनेच्या संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनीता राणे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, प्रशांत काळे, उपशहर प्रमुख अमित बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांची गर्दी पाहून हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असून दसरा मेळाव्याला कोणतं मोठं मैदान शोधावं हा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एनडीआरएफच्या निकषात डबलने मदत केली जाणार आहे.

उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असतात बाळासाहेबांचा फोटो काढून टाका. मात्र बाळासाहेब हे एका कुटुंबाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवा. निवडणूकीपूर्ती महाराजांना आठवायचं नंतर विसरून जायचं हे काम सुरू असल्याची टीका यावेळी दादाजी भुसे यांनी केली.

तर शिवाजी पार्कच्या परवानगी बाबत भुसे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही लोकशाही मानणारे शिवसैनिक आहोत. झालं ते चांगलं आहे. शिवाजी पार्क ची क्षमता कमी असल्याने तिथे एवढे शिवसैनिक बसणार नाहीत. त्यामुळे मोठ्या मैदानात हा दसरा मेळावा होणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी दिवाळीत राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री विशेष भेट देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. दसरा मेळाव्याची ही बैठक असून जेव्हा मेळावा होईल तेव्हा मैदान देखील कमी पडेल. ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मुख्यमंत्री ज्या प्रकारे कामं करत आहेत त्यामुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. इतकं गतिमान सरकार महाराष्ट्राने पाहिले नव्हते. बाळासाहेबांचे विचार बासनात बांधून अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सुरू होतं. या सत्तेचा फायदा फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. त्यावेळी पक्ष वाढीसाठी सत्तेत आलो. मात्र उलटं झालं. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता काम करत होता तिथे राष्ट्रवादी काँग्रेस वाढत गेली. आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दाबलं गेलं. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या. आमदारांचा निधी थांबविला. आधी नावाला एक आणि कामाला दुसरा मुख्यमंत्री होता. मात्र आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सगळीकडे दिसत असल्याने त्यांना पोटशूळ उठला असल्याचा खोचक टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

तर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटो बद्दल हा फोटो ठाण्यातील घरातला असल्याचे सांगत आता घरी बसायची देखील चोरी असल्याचे सांगितले. मी सलग दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवून पहिल्या वेळी अडीच लाख मताधिक्याने आणि दुसऱ्यांदा साडेतीन मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुळे मी घरात बसायचं कुठे ? कुठे नाही ? ते मला कळतं. आज पर्यंत एकनाथ शिंदे यांची खुर्ची दिसत होती आता माझी पण खुर्ची दिसत आहे असा टोलाही लगावला.

एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक कामं झाली. आनंद दिघेनंतर शिवसैनिकांना आधार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीच केलं. शिवसेना वाढविण्याचं काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुहृदयसम्राटचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे झालं, ठाकरे सरकार हिंदुत्व विसरल्याची टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी करत दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *