Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या दूर केल्या तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल!

भाईंदर, प्रतिनिधी: दर वर्षी 08 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा विविध स्वरूपात सन्मान केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे महिला सफाई कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (जनसंपर्क) संजय शिंदे, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, अधिकारी व महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम आयुक्त यांनी उपस्थित महिला अधिकारी, महिला सफाई कर्मचारी यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले मिरा भाईंदर शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान हे महत्त्वाचे असल्याचे मत आयुक्त यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा आपले शहर स्वच्छ व सुदंर ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचारी यांनी महत्त्वाचे योगदान दिले. म्हणूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य कार्यालयातील सर्व महिला अधिकारी यांचा देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी केला असला तरी वर्षभर शहरातील सफाईचे कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य त्यांना दिले जात नाही, त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी देखील केली जात नाही अशा अनेक समस्यांना या महिलांना तोंड द्यावे लागत आहे त्यावर महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन सुधारणा केल्या तरच खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल अशी प्रतिक्रिया उपस्थित काही महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *