Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या भूखंडावर कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले असून उत्तनच्या रहिवाशांचा या आरक्षणाला विरोध असल्याचे बोलले जात आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला आधी डम्पिंग ग्राऊंड सारखा घाणेरडा कचरा प्रकल्प दिला आणि आता त्याच परिसरात कत्तलखाना उभारण्यात येणार असून उत्तनच्या परिसरातील लोकांनाच मिरा भाईंदर महानगरपालिके कडुन असे घाणेरडे प्रकल्प का दिले जात आहेत? असा सवाल येथील नागरिकां कडून केला जात आहे.

उत्तनच्या धावगी येथील डम्पिंग ग्राऊंड मुळे आधीच येथील जनता त्रस्त झालेली आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे व त्यामुळे उत्तनच्या रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. त्यातच आणखीन दत्तमंदिर कोपरा ह्या ठिकाणी मेट्रो कारशेड होणार असल्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात येत आहेत, MMRDA विकास आराखड्यात येथे मलःनिसारण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आणि आता उत्तन शिरेरोड येथे कत्तलखान्यासाठी (सर्वे नं 282/4) ही भातशेतीची जमीन संपादनासाठी लोकांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले जात आहेत.

उत्तनमध्ये धावगी, डोगंर पायथा व शिरेरोड ह्या ठिकाणी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय चालतो. उत्तन डम्पिंग ग्राऊंडच्या दूषित पाण्यामुळे तीकडची शेतजमीन नापीक झाली आहे. डंम्पीगमुळे येथील वातावरण, जमीन तसेच जल प्रदूषण देखील होत आहे. डंम्पीग ग्राऊंडचे दूषित पाणी समुद्रात जाऊन गेल्यामुळे येथील मासेमारीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. असे असताना आता उत्तनमध्ये कत्तलखान्या सारखा घाणेरडा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या विकास आराखड्यात यापूर्वी देखील उत्तन परिसरात कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले होते परंतु ह्या कत्तलखान्याला स्थानिकांचा आधिपासुनच विरोध आहे. कारण ह्या ठिकाणी बाहेरची गुरेढोरे आणुन ईथे कापली जातील ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरेल. घाणेरडे पाणी शेतात व समुद्रात जाऊन जल प्रदूषण होईल अशी भिती उत्तनच्या नागरिकांमध्ये पसरलेली आहे.

उत्तन परिसरातील रहिवाशांना चांगल्या सरकारी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असावे, चांगली उद्याने असावीत अशी सर्वाची ईच्छा आहे. कोळी लोकांना बोटीतुन मासळी उतरविण्यासाठी आधुनिक पद्धतीची जेटी असावी, मासळी साठविण्यासाठी आधुनिक पद्धतीचे शीतगृह असावे, मासळी विकण्यासाठी आधुनिक पद्धतीची बाजारपेठ/ मार्केट निर्माण करण्यात यावे, मासळी सुकविण्यासाठी Fish drying yards तयार करण्यात यावेत अशा मूलभूत सुविधांची गरज असताना महाराष्ट्र शासन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन मात्र उत्तन सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात घाणेरडे प्रकल्प लादत असल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.

शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला अनेक नागरीकांनी हरकत घेतली असून हे आरक्षण रद्द न केल्यास उत्तनच्या रहिवाशां तर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *