Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

आधारवाडी जेल च्या स्वच्छतागृहात सापडल्या मोबाईलसह संशयास्पद वस्तू ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या आधारवाडी कारागृहाच्या स्वच्छतागृहात मोबाईल, वायरचा मोठा तुकडा, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड, टाचण्या आणि एमसील या वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या वस्तू कोणी आणि कश्या आत आणल्या याचा तपास सुरू असून जेल प्रशासनाने अज्ञात व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आधारवाडी कारागृहाचे हवालदार संदीप शेट्ये हे शुक्रवारी सकाळी कारागृहाच्या आतमध्ये सुरक्षाव्यवस्था पाहण्याचे काम करीत असताना त्यांना सर्कल क्रमांक-३ च्या खोली क्रमांक ७ मध्ये काही संशयास्पद वस्तू आढळल्या. त्यांनी तत्काळ तुरुंग अधिकारी धीरजकुमार रुकमे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तातडीने खोलीच्या शौचालयाची झडती घेतली असता तेथे असणाऱ्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये एक लोणच्याची बाटली ठेवल्याचे आढळून आले. ही बाटली उघडून तिची तपासणी केली असता त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल, वायरचा मोठा तुकडा, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड, टाचण्या आणि एमसीलच्या २ पुड्या आढळून आल्या. कारागृहात इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही एकाच वेळी एव्हड्या सर्व वस्तू सापडल्याने जेल प्रशासनही बुचकाळ्यात पडले आहे. कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी तुरुंगातल्या कैद्यांकडे चौकशी केली असता या वस्तूंविषयी काहीच माहीत नसल्याचे सांगितले.

दरम्यान, हे साहित्य तुरुंगातील बरेकमध्ये कसे पोहोचले याचा शोध घेतला जात आहे. तर हवालदार संदीप शेट्ये यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे तुरुंग अधिकारी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *