Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३६४ येथील बांधलेल्या अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई

संपादक: मोईन सय्यद/ मिरारोड प्रतिनिधी

मिरारोड : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून गेल्या काही आठवड्यापासून अशी अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली जात आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनाधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेजेस, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत झोपड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शहरात अशा प्रकारे सरकारी जागेवर अथवा आरक्षित जमिनीवर वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकामे उभी राहतात, त्यांच्या अनेक तक्रारी देखील केल्या जातात मात्र त्या त्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या संगनमताने या अनधिकृत बांधकामांना कर आकारणी केली जाते, पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिले जाते, दिवाबत्ती, रस्ते नाले, गटार, सौचालय इत्यादी सुविधा पुरविल्या जातात तेव्हां महानगरपालिका अधिकारी डोळे मिटून बसलेले असतात.

अनेक वर्षे उलटून गेल्यावर एकतर न्यायालयाचे आदेश आल्यावर किंवा आरक्षित जमीन विकसित करण्याची गरज भासल्यास या अधिकाऱ्यांना आठवण येते की ही सर्व बांधकाम अनधिकृत आहेत. मग त्या ठिकाणी वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांचा कसलाही विचार न करता ही अनधिकृत बांधकामे तोडून टाकली जातात आणि शेकडो कुटुंब उघड्यावर पाडली जातात. हे दुष्टचक्र गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले आहे.

अनधिकृत बांधकामा बाबत अनेक नियम आहेत कायदे आहेत, उच्च न्यायालया पासून सर्वोच्च न्यायालया पर्यंत अनेक आदेश आहेत मात्र सर्व नियम कायदे आदेश धाब्यावर बसवून ह्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जाते.

आताही अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या झोपड्या २७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रभाग क्रमांक ६ येथील आरक्षण क्रमांक ३६४ या उद्यान आरक्षणावर मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली काशिगावं येथील आरक्षण क्रमांक ३६४ येथे ३०० अनधिकृत बांधण्यात आलेल्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच एकूण ३० मीटर डी.पी रस्ता आणि १.५ एकर जागा रिकामी करण्यात आली.

सदरची कारवाई आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपायुक्त अमित काळे, काशिमीरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, नगररचना विभागाचे श्रीकृष्ण मोहिते, प्रभाग क्रमांक १ ते ६ चे सर्व प्रभाग अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक माणिक पाटील व त्यांचे अधिनस्त पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *