आपलं शहर

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

संपादक: मोइन सय्यद

विरार लोकलला आज 154 वर्षे पूर्ण झाली !!!

१२ एप्रिल, १८६७ रोजी दिवशी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाऱ्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, कारण मध्ये स्थानके कमी होती. स्थानके अशी होती – नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड.

मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे, कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन – देशातली पहिली ट्रेन – धावली. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे माजी मुख्य ऑपरेशन मॅनेजर ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे.’ मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *