Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

विश्वास वळवी याच्यावर जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

पालघर: ठाणे कोलशेत येथील एका जमीन खरेदी प्रकरणात आदीवासी कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि समाजसेवक विश्वास वळवी याच्यावर ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.

ठाणे कोलशेत येथील दत्तू नथू बारे यांच्या नावे सर्वे क्र.२८२/१ मध्ये एकूण १६७९० चौमी कब्जे वहीवाटीची जमीन होती. ही जमीन दत्तू बारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वारसांकडून विश्वास दाविद वळवी याने १४,९४,३१,००० रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारामध्ये विश्वास वळवी याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन खरेदी विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी ४ वारसदाराना प्रत्येकी ३,७३,५७,८८५ रुपयांचे धनादेश देऊन पुन्हा ते धनादेश तुम्हाला नंतर देतो असे सांगून परत स्वत:कडे ठेवून घेतले होते.

त्यानंतर विश्वास वळवी यांनी ४ वारसदारांपैकी १ वारसदार असलेल्या बाजीबाई तुकाराम कोम यांना वारंवार मालाड येथील पंजाब नॅशनल बँकेत नेऊन त्यांच्या आशिक्षीतपणाचा फायदा घेत तुझे बँक खाते उघडून तुझ्या खात्यात कोलशेत येथील जमिनीचे तुझ्या हिश्श्याचे पैसे जमा करतो असे सांगून चेकबुक, कोरे कागद तसेच काही फॉर्मवर अंगठे घेतले व बाजीबाई कोमच्या खात्यावर जमा असलेली करोडोंची रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वळती करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बाजीबाई कोम यांचा मुलगा साजन कोम याने कापुरबावडी पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या तक्रारीनंतर जमीन खरेदी विक्री प्रकरणात आदीवासी कुटुंबाची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच्या या घटनेची गंभीर दखल घेत हे प्रकरण ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात मोठी बँनरबाजी करत शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या विश्वास वळवी याच्यावर एका आदीवासी कुटुंबाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी भा.दं.वि. ४२० आणि ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *