Latest News ताज्या महाराष्ट्र

अखेर बहुप्रतिक्षित गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!

उद्घाटनाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिरकलेच नाही तर माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाले सह मेहता समर्थक नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर घातला गोंधळ!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यात मोलाची भर टाकणारे परंतु गेली अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिमाखदार कार्यक्रमात पार पडले.

मिरा भाईंदर महानगरपालिका शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि स्केटिंग रिंग व नाट्यगृह लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चिमाजी अप्पा स्मारक आणि महाराणा प्रताप स्मारकाचे रिमोट कंट्रोल द्वारे ई-अनावरण देखील करण्यात आले.

सर्वप्रथम मिरारोड पूर्व, महाजन वाडी येथील लोढा अमेनिटी स्केटिंग रिंगाचे लोकार्पण, तद्नंतर मिरारोड पूर्व, आरक्षण क्रमांक 302 येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन व मिरारोड पूर्व घोडबंदर येथे नवीन महानगरपालिका प्रशासकीय भवन यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.

त्यानंतर मिरारोड पूर्व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह फलकाचे अनावरण करण्यात आले. तदनंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांची चित्रफित दाखवण्यात आली. तद्नंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्या हस्ते भाईंदर पश्चिम येथील चिमाजी अप्पा स्मारक व भाईंदर पूर्व येथील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ई-अनावरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास राज्यस्तरीय आदीवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत (राज्यमंत्री दर्जा), लोकसभा सदस्य राजेंद्र गावित, ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर मतदार संघाच्या आमदार गीता जैन, आमदार पराग शाह, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी खतगांवकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, भाजप जिल्हाध्यक्ष रवी व्यास, नगरसेविका परिशा, नाट्यगृहाच्या वास्तुविशारद मुग्धा पतकी, रुग्णालयाचे विकासक अतुल शहा, महापालिका प्रशासकीय भवनाचे विकासक विजय जैन, वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेचे सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त व प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली असली तरी पूर्वनियोजित कार्यक्रम असून देखील आणि निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असलेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गैरहजेरी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत होती.

त्याच प्रमाणे माजी आमदार नरेंद्र मेहता देखील प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असून सुद्धा ते नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उशिराने पोहोचले आणि आपल्या सर्व समर्थकांना नाट्यगृहात प्रवेश देण्याचा हट्ट करू लागले तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवले असता नरेंद्र मेहता आणि त्यांच्या समर्थकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडून गोंधळ घातला.

महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शासनाची पूर्ण परवानगी नसताना अशासकीय पद्धतीने घाई गडबडीत उद्घाटन करून महाराणा प्रताप स्मरकावर माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाची पाटी लावलेली होती. आता सर्व शासकीय परवानग्या मिळल्या नंतर ती पाटी काढून पुन्हा शासकीय पद्धतीने उद्घाटन केल्याचा राग मनात ठेवून माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांचे समर्थक मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून नाट्यगृहात गोंधळ घालणार असल्याची कुणकुण पोलिसांना आधीच लागली होती आणि म्हणूनच त्यांना प्रवेशद्वारा जवळ पोलिसांनी त्यांना अडवले असल्याची चर्चा आता शहरात केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, माजी आमदार, माजी खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून सर्व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा-भाईंदर महानगरपालिके आयुक्त व प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *