Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ब्रिटनमध्ये थैमान; भारतासाठी चिंतेची मोठी बाब..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लंडन येथील ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. काल तिथे ५१,८७० नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सहा महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या ब्रिटन ने गाठली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदा ५० हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे ब्रिटनचे आरोग्य मंत्रीच कोरोना बाधित झाले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये ६८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. असे असले तरी देखील तिसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने युरोपसह भारताच्या चिंता वाढल्या आहेत. आरोग्य मंत्री साजिद जावेद यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेगाने कोरोना पसरू लागल्याने माजी आरोग्यमंत्र्यांनी सरकारला पुन्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागणार आहे, असा इशारा दिला आहे. तसेच १२०० हून अधिक तज्ज्ञांनी लॉकडाऊन पूर्णपणे हटविणे हे खतरनाक आणि अनैतिक असेल, असा इशाराही दिला आहे.

ब्रिटनमध्ये १९ जुलैपासून सर्व निर्बंध हटविण्याची तयारी सुरु आहे. याच काळात कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने मोठी उसळी घेतली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. माजी आरोग्य मंत्री जेरेमी हंट यांनी सरकारला पुन्हा लॉकडाऊन लावायची वेळ पडणार आहे, असे म्हटले आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलाईज होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन आठवड्यांत दुप्पट होत आहे. यामुळे परिस्थिती धोकादायक बनू लागली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ आहे. तिसरी लाट ज्या प्रकारे विक्राळ होत चालली आहे, त्यावरून सरकारने निर्बंध हटवू नयेत. असे केल्यास पाप ठरेल असा इशारा जगभरातील १२०० तज्ज्ञांनी दिला आहे. लॅन्सेटमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *