Latest News महाराष्ट्र

खासगी डॉक्टरांची पालिकेच्या सेवेकडे पाठ; कारवाईच्या नोटिसांनंतरही महाभरतीला अल्प प्रतिसाद

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाचे वाढते रुग्ण, त्यात अपुरी आरोग्य यंत्रणा यामुळे पालिकेने खासगी सेवेतील डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत पंधरा-पंधरा दिवसांसाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेने आता या डॉक्टरांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

दुसरीकडे पालिकेनेदेखील आरोग्य विभागात डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती सुरू केली असून त्यालादेखील म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. वसई-विरार शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. दिवसाला ९०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने कोरोना उपचार केंद्रे वाढविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ महापालिकेकडे नाही. त्यामुळे पालिकेने खासगी डॉक्टरांना १५ दिवसांसाठी सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. मागील वर्षीदेखील पालिकेने हा प्रयोग राबवला होता. मात्र यंदा पालिकेच्या या आदेशाकडे खासगी डॉक्टरांनी पाठ फिरवली आहे.

जे खासगी सेवेतील डॉक्टर पालिकेला सेवा देणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशा नोटिसा डॉक्टरांना पाठविण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आरोग्य विभाग अधिक बळकट करण्यासाठी पालिकेने एम.बी.बी.एस., बी.एच.एम.एस., बी.एम.एस. डॉक्टर्स तसेच परिचारिका, आरोग्य सेविका यांच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
थेट मुलाखत घेऊन तात्काळ सेवेत रुजू केले जाणार आहे. यासाठी मुलाखती सुरू आहेत. मात्र त्यालादेखील फारसा प्रतिसाद मिळत नाही. पालिकेकडून दिले जाणारे मानधन कमी आहे तसेच कोरोना काळात धोका नको म्हणून डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी येण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *