Latest News महाराष्ट्र

गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश; रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात नियमावली तयार करा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोणत्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयाला विशेषतः कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसात, देशातल्या काही राज्यांमधल्या काही रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्याने आता गृहमंत्रालयाला जाग आली आहे. याबद्दल एक निवेदन गृहमंत्रालयाने दिलं आहे. यात म्हटलं आहे, राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केल्यानंतर केंद्रिय गृहसचिव यांनी हे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत आग लागलेल्या घटना पाहता, तसंच उन्हाळ्याच्या दिवसात वाढणारं तापमान लक्षात घेता हे समोर येत आहे की, वाढत्या तापमानामुळे, देखभालीच्या अभावामुळे किंवा काही यंत्रांवर ताण आल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ज्यामुळे माणसांचे जीव जात आहेत, तसंच अत्यावश्यक साधनसामुग्रीचंही नुकसान होत आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रुग्णालयांचं आगीपासून संरक्षण करण्यासाठीचा सुनियोजित आराखडा तयार करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना वेळोवेळी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेची, तसंच इतर उपयुक्त यंत्रणांची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, असं सांगण्यात आलं आहे. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक विभागाच्या महासंचालकांनी जारी केलेल्या नियमावलीचाही उल्लेख गृहमंत्रालयाने केला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *