Latest News कोकण गुन्हे जगत महाराष्ट्र

गॅसवर चालवला जाणारा हातभट्टी दारु बनविण्याचा अड्डा भाईंदर पोलिसांनी केला उध्वस्त, आरोपी राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार!

संपादक मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: बुधवारी पहाटे चारच्या सुमारास भाईंदर पोलिसांनी धाडसी कारवाई करत भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावाच्या आतील खाडीच्या दलदलीच्या भागात हातभट्टीची अवैध दारू बनवणारा अड्डा उध्वस्त केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांच्या सूचनेनुसार एपीआय विश्वास बब्बर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही धाडसी कारवाई केली. या हातभट्टी दारूच्या अड्ड्याबद्दल पोलिसांना एक गुप्त सूचना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंदराव पाटील यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी फायबर बोटीने प्रवास करावा लागला.

खारफुटीच्या घनदाट झाडांच्या आतमध्ये हा दारु बनविण्याचा अड्डा चालवला जात होता. पोलीस शिपाई शिंदे, मुल्ला आणि सानप यांना दलदलीतून होडी बाहेर काढण्यासाठी अक्षरशः हाफ पँट आणि टी-शर्ट घालून चिखलात जावे लागले. पुढे घटनास्थळी पोहचण्यासाठी त्यांना खाडीच्या खोल चिखलातुन चालत जावे लागले.

सर्वांत आश्चर्य म्हणजे याठिकाणी मद्यनिर्मिती करण्यासाठी लाकूड पेटुवून भट्टी लावण्या ऐवजी गॅसवर चालणारी भट्टी वापरत असल्याचे दिसून आले जेणेकरून लाकडांचा धूर आणि आग दिसणार नाही आणि पोलिसांची कारवाई टाळता येईल. पोलिसांनी येथील दारु बनवण्यासाठी वापरले जाणारी सर्व उपकरणे नष्ट केली असून भट्टीसाठी वापरले जाणारे 25 एलपीजी गॅस सिलेंडर, 200 लिटर रासायनिक द्रव्य भरलेले ड्रम जप्त केले.

ही अवैध दारुची भट्टी चालवणारे राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *