Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

तहसीलदार कार्यालय समोर काँग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदोलन

“बहुमताच्या जोरावर भाजप कडून हम करे सो कायदा पद्धत राबविली जात असल्याने देशाची राज्यघटना धोक्यात!” – मुझफ्फर हुसैन

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७५ वर्षातील मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या राजवटीत चुकीच्या धोरणांमुळे देश अधोगतीला गेल्याची टीका काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी केली. काँग्रेसने देश घडवला व मोठा केला परंतु आज देश एका उद्योगपतीच्या इशाऱ्यावर चालवला जात आहे हे दुर्दैव आहे.

काँग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले आहे, ” जबाब दो मोदीजी” म्हणत संसद ते सडक अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्याची मागणी करीत भाईंदर येथील तहसीलदार कार्यालयाला घेराव घालत निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सचिव आनंद सिंह, जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक राजीव मेहरा, गीता परदेशी, फरीद कुरेशी, अश्रफ शेख, महिला अध्यक्ष रूपा पिंटो यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक, सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुझफ्फर हुसैन पुढे म्हणाले की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासियांना “डरो मत” चा संदेश दिला असून जे प्रश्न संसदेत विचारले तेच प्रश्न सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून विचारत आहेत परंतु नरेंद्र मोदी आपल्या उद्योगपती मित्रासाठी काहीही बोलण्यास तयार नाहीत याचा अर्थ हा देश कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, प्रश्न विचारला म्हणून राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व तडकाफडकी रद्द केले जाते, ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे, आरक्षण हटवून मनुवादाला प्रोत्साहन देत समान नागरी कायदा आणण्याचा डाव आखला जात असल्याचे हुसैन म्हणाले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर जीएसटी लावून महागाई वाढवली, बेरोजगारी वाढल्याने युवक नाराज, महिला असुरक्षित असल्याने देशाची जनता रस्त्यावर उतरून आगामी काळात मोदींना जाब विचारेल असे प्रदेश सचिव आनंद सिंह म्हणाले. देशाची घटना धोक्यात आली असून धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद असे मुद्दे पुढे करून वातावरण कलुषित करीत मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी सांगितले. यावेळी अनिल सावंत, रुबिना शेख, दिनेश सक्सेना, श्याम शहारे, सिद्धेश राणे, राकेश राजपुरोहीत, महेंद्र सिंह, कुणाल काटकर, साहेबलाल यादव यांनी विचार व्यक्त केले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *