देश-विदेश

मूत्रपिंड विकार असलेल्यांनी उत्तम आयुष्य कसे जगावे..???

World Kidney Day

सध्या देशात अनेक लोक मूत्रपिंड विकारासह आयुष्य जगताना दिसून येत आहेत. या आजारांबद्दल लोकांमध्ये फारशी माहिती नसल्याने या आजाराकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रपिंड निकामी झाल्यास मृत्यू अटळ आहे, असे मानून अनेक जण धास्तावतात. परंतु, मूत्रपिंड विकार म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो. जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास मूत्रपिंडाने त्रस्त असणारे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत.

मूत्रपिंड हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचे कार्य मूत्रपिंड करते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्यपद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतु, योग्यरित्या काळजी न घेतल्यास मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. मूत्रपिंड दररोज १८० लीटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लीटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणासह मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते. रक्तदाब नियंत्रणात राहतो, शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीलाही मदत मिळते.

मूत्रपिंडाचा विकार असलेल्या अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार लवकर लक्षातच येत नाही. हळूहळू थकवा येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, रात्री लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे, सारखे लघवीला जावे लागणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येता. पण या आजाराबद्दल माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वेळीच निदान न आल्याने आजार बळावतो.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मूत्रपिंडाच्या आजाराने पिडित अनेक रूग्णांना वर्षांनुवर्ष औषध आणि डायलिसिस वर राहावे लागते. यातील अनेक रूग्णांना मानसिक दडपणही येतं. परंतु, जीवनशैलीत आवश्यक बदल केल्यास हे रूग्ण निरोगी आयुष्य जगू शकतात.

तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर कसे जगायचे ते जाणून घ्या…

1. निरोगी आहार घ्या – मूत्रपिंडाच्या समस्येमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकते. यामुळे मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. रक्तदाब व मधुमेही रूग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ताजी फळे, भाज्या आणि बटाटे आणि संपूर्ण धान्य यासारख्या पदार्थांचे आहारात समावेश करा. नियमित आहारात सोयाबीन, डाळी, मासे आणि अंडी समाविष्ठ करा. जेवणात मीठाचा वापर कमी करा. मसालेदार, तेलकट आणि जंक फूड खाऊ नये. मूत्रपिंडाची समस्या असल्यास द्रवपदार्थाचे अधिकाधिक सेवन करा.

2. शारीरिक स्वास्थ्य राखा – मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रूग्णांनी शारीरिक स्वास्थ्यसाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. याशिवाय तुम्ही फिजिओथेरपिस्टचाही सल्ला घेऊ शकता.

3. मद्यपान आणि धूम्रपानाचे सेवन करणे टाळा – धुम्रपानाच्या सेवनामुळे फुफ्फुसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपानाचे सेवन करणं शक्यतो टाळावे. त्याचप्रमाणे दारूचे अतिरिक्त व्यसनही आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते.

4. नियमित पाठपुरावा करा – आपल्या शरीरात होणारे बदल लक्षात घ्या. काही लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधांसंदर्भात कुठलीही शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा. नियमितपणे रक्तातील साखरेची मात्रा तपासून घ्या.

5. कुटुंबियांशी आपल्या स्थितीबद्दल बोला – स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवू नका. आपल्या आरोग्याच्या स्थितीबद्दल कुटुंबियांशी मनमोकळेपणे बोला. मूत्रपिंडाने त्रस्त असणाऱ्या इतर लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. याशिवाय मनातील भिती घालवण्यासाठी समुपदेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.

लेखक : डॉ. महेश प्रसाद, सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट, वोक्हार्ट रूग्णालय मीरारोड

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *