Latest News गुन्हे जगत

परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसूलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा दावा अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या ठाण्यातील गैरकारभाराचा सर्व प्रकार घाडगे यांनी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांसमोर ठेवला आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर आरोप करत या सगळ्या प्रकाराची चौकशी होऊन सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केली आहे.

तर या अगोदरही परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारे एक पत्र मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने लिहिले होते. दरम्यान, या पत्रामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंग यांच्यावरील आरोप-
1. रिव्हॉल्वरच्या परवान्यासाठी परमबीर सिंग हे प्रकाश मुथा या व्यक्तीमार्फत दहा ते पंधरा लाख रुपये घेत असत.

2. बिल्डरांची देवाण-घेवाण तसंच सेटलमेंट करण्याचे काम परमबीर सिंग करत होते. जो अधिकारी परमबीर सिंग यांचे बेकायदेशीर काम करण्यास मनाई करत असे, त्याची बदली नियंत्रण कक्षात केली जात होती किंवा त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असत.

3. परमबीर सिंग यांनी बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला. यासाठी त्यांनी एक एजंट राजू अय्यर याची नेमणूक केली. राजू अय्यर याच्याकडे पैसे जमा झाल्यानंतर बदल्या होत असत.

4. परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूर येथे एक व्यवसाय आहे. त्यात परमबीर सिंग यांनी दोन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांना ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

5. परमबीर सिंग यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला वजा फ्लॅट घेतला आहे.

6. परमबीर सिंग यांनी प्रत्येक झोनच्या डीसीपीकडून दिवाळीला भेट म्हणून 40 तोळे सोन्याची बिस्किटसह पोलीस आयुक्तांकडून वीस ते तीस तोळ्याची सोन्याची बिस्कीटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून ३०-४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत, असा आरोप पत्रामध्ये करण्यात आला आहे.

7. परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल लोअर परेल येथे कार्यालय आहे. पत्नीच्या माध्यमातून परमबीर सिंग यांची इंडिया बुल येथे ५००० कोटींची गुंतवणूक आहे.

8. परमबीर सिंग ठाणे आयुक्त असताना बिल्डर जितू नवलाणी यांच्याकडे १००० कोटींची गुंतवणूक वेगवेगळ्या व्यवसायात केली. या अगोदर देखील परमबीर सिंग यांच्यावर मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केले होते.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *