Latest News ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

राज्यात १५,५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी; अजित पवारांची माहिती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील विविध विभागातील १५,५११ रिक्त पदांची एमपीएससीकडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. त्यानुसार २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. गट अ – ४४१७, गट ब – ८०३१, गट क – ३०६३. अशी एकूण १५,५११ इतकी पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *