कोकण ताज्या

शिवसेनेचे वादग्रस्त खासदार राजेंद्र गावितां विरुद्ध त्यांच्याच महिला कर्मचाऱ्यांने दाखल केला विनय भंगाचा गुन्हा.

पालघर, प्रतिनिधि :  पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मिरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नया नगर पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार महिला खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. राजेंद्र गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

तक्रारदार महिला गेल्या १५ वर्षांपासून खासदार राजेंद्र गावितांच्या एका गॅस एजन्सीमध्ये काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझा लैंगिक छळ, अत्याचार, शोषण केले जात आहे. सन २००५ मध्ये गावित अचानक घरी आले आणि भेटवस्तू म्हणून मोबाईल आणला आहे, असे सांगितले. त्यावेळी मी तो घेण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याशी मैत्री कर, तुला घर, पैसा सर्व देतो, मला शारीरिक सुख दे, असे म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय अनेकदा आपला विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या अगोदर मी कोकण भवन पोलीस महानिरीक्षकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, राजकीय दबाव असल्याने माझी तक्रार नोंदवली गेली नाही. आज माझी तक्रार दाखल केली. गावित मोठे नेते आहेत, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

या संदर्भात मिरारोड विभागाचे पोलीस सहआयुक्त विलास सानप यांच्याशी संपर्क साधला असता कॅमेरा समोर बोलू शकत नाही, असे म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क केला असता, त्या गोष्टीमध्ये काहीही अर्थ नाही, माझ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी फक्त लेखी पत्र दिले आहे. माझ्या गॅस एजन्सी मध्ये ही महिला गॅसचा काळाबाजार करायची. माझ्या कंपनीत १ कोटी पेक्षा अधिक पैशांची त्यांनी अफरातफर केली आहे. याबाबत मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सहा दिवस त्यांनी तरुंगवासही भोगला आहे. सदरचा आरोप खोटा आहे अशी माहिती खासदार गावित यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या विषयी थोडक्यात-
काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मूळचे नंदूरबारचे असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. 2014 लोकसभा आणि 2016 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या अपमानाला कंटाळून आपण पक्ष सोडल्याचे गावित यांनी सांगितले होते.

भाजपमध्ये गेल्यानंतर युतीच्या जागा वाटपानंतर पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला. त्यामुळे गावित यांनी 26 मार्च 2019 ला शिवसेनेमध्ये प्रवेश केला. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष माझ्यासाठी सारखेच असल्याची प्रतिक्रिया गावित यांनी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांचा पराभव केला.

या प्रकरणात खासदार राजेंद्र गावित यांनी जरी विनयभंग केल्याचे आरोप फेटाळून लावले असले तरी त्यांची वृत्ती रंगेल आहे आणि अशा प्रकारचे त्यांनी असे अनेक कारनामे केले आहेत परंतु राजकीय दबावापोटी कुणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही मात्र या तक्रारदार महिलेने हिम्मत दाखवली म्हणून हे प्रकरण बाहेर पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात किती खरे किती खोटे हे तर तपासा नंतर बाहेर येईल त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *