Latest News

सुधीर मुनगंटीवारांच्या विधानावरुन सभागृहात गदारोळ; सत्ताधारीही आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार राज्य सराकारच्या कारभारावर हल्लाबोल करत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतापलेल्या मुनगंटीवारांनी अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलत होते, आता ते आत जात आहेत, अशी धमकीच सभागृहात दिली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले.

विरोधक थेट सभागृहात नेत्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत. विरोधकांनी धमक्या देण्याचं काम करू नये, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही मुनगंटीवारांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांचं विधान विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनीही तातडीनं दखल घेत मुनगंटीवारांचा विधान कामकाजातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आजच्या कामकाजाच्या पत्रिकेवरच आक्षेप घेतला. त्यानंतर ५०ए अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार बोलत असताना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी त्यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही ? अनिल देशमुख देखील असेच मध्ये मध्ये बोलायचे. आता ते आत जात आहेत. त्यामुळे असे मध्ये मध्ये बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलतोय. तो माझा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचं काही कारण नाही. सरकारची चमचेगिरी सुरू आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

मुनगंटीवारांच्या विधानानंतर सत्ताधारी पक्षातून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देण्याचं काम करत आहेत का ? विरोधकांनी धमकी देण्याचं काम करू नये, असं नाना पटोले म्हणाले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *