Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मिरा-भाईंदर शहरात महापालिका प्रशासना तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलां करिता मॅमोग्राफी मशीनचे महापौर, आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

मिरा-भाईंदर : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मिरा भाईंदर शहरात देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव” तसेच “घरोघरी तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ला या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील डेब्रिज उचलणे, गवत काढून सफाई करणे, ज्याठिकाणी जास्त प्रमाणात जंगली गवत आले आहे ते साफ करून संपूर्ण किल्ल्याचा परिसर हा नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झाले.

तसेच आरक्षण क्रमांक ३६४ येथे ‘मियावाकी’ या जापानच्या तंत्रज्ञानावर आधारित उद्यानामध्ये महापौर ज्योत्स्ना हसनाले आणि आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मिरा-भाईंदर शहरात जास्तीत जास्त झाडे लावून ‘आपली वसुंधरा’ ही निर्मळ करण्याचा ध्यास मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला असून महापौर व आयुक्त तसेच सर्व पदाधिकारी आणिअधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश यावेळी शहरवासीयांना देण्यात आला.

त्याच बरोबर मिरारोड पूर्वेकडील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात महिलांकरिता मॅमोग्राफी मशीनचे लोकार्पण देखील करण्यात आले. या मॅमोग्राफी मशीन द्वारे महिलांना डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्यानुसार स्तन कर्करोगाचे मोफत परीक्षण करण्यात येणार असून ज्या महिलांना स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) बाबत शंका आहे त्या महिलांनी स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

भाईंदर पश्चिमेकडील मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात मिरा-भाईंदर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मिरा भाईंदर शहरातील जवळपास 42 अजरामर होऊन गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती देणाऱ्या विशेष दालनाचे महापौर व आयुक्त यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती होणे या उद्देशाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या संकल्पनेतून या स्वातंत्र्य सैनिकांच्या माहिती दालनाचे लोकार्पण करण्यात आले.

सदर या कार्यक्रमाच्या प्रसंगी महापौर श्रीमती ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, स्थायी समिती सभापती राकेश शाह, महिला व बालकल्याण समिती सभापती मिरादेवी यादव, उपसभापती विवीता नाईक, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, संगणक तथा जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, सर्व सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्थानिक नगरसेवक, उद्यान अधिक्षक, उद्यान विभागाचे कर्मचारी, स्वच्छता अधिक्षक, स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा प्रकारे शहरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयाच्या संपूर्ण इमारतीला तीन रंगाची अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आली असून अशा प्रकारे ‘अमृत महोत्सवाची’ सुरुवात केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 08.00 वाजता महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमात देखील शहरातील नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *