गुन्हे जगत

अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई; सचिन वाझेंच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्याला एनआयए ने केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांचे सीआययू तील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांना अटक केली. काझी यांनी सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि सचिन वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांना रविवारी अटक केली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याच्या आरोपाखाली एनआयए ने आधीच सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझे यांची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास त्यांनी वाझे यांची मदत केल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत एपीआय रियाझ काझी यांना आज एनआयएने अनेक दिवसांच्या चौकशीनंतर अटक केली. एनआयए ने काझी यांची अनेक दिवस कित्येक तास चौकशी केलेली आहे. काझी यांनी पुरावे नष्ट करण्यास आणि या गुन्ह्यात वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे यांच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर घेऊन जाणारा काझीच असल्याचे सांगण्यात येत आहे. कारच्या बनावट नंबर प्लेट खरेदी केल्याच्या प्रकरणातील आरोपीही असल्याचे मानले जाते. काझी यांना एनआयए कोठडीसाठी आज न्यायालयात हजर केले जाईल. सचिन वाझे यांना याआधीच एनआयएने अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्येच्या कटाचा आरोपही आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *