देश-विदेश

कोविड -19 पेक्षा हि जास्त खतरनाक कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे संपूर्ण युरोपमध्ये उडाली खळबळ!

युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत या विषयी सखोल चर्चा केली आहे.

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत असल्याचे बोलले जात आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याची माहिती WHO ने दिली आहे.

सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.

युकेमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडसह लंडनमध्ये सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन कठोर स्वरूपाचं आहे. वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.

कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे युरोपात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे. रविवारी (20 डिसेंबर) नेदरलँड्सने युकेमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली असून ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असेल.

युकेमध्ये नव्या प्रजातीचा व्हायरस निर्माण झाल्याचं समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला आहे. नव्या विषाणूचा धोका किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यात येईल, हा धोका कमी कसा करता येईल, याचे प्रयत्न करण्यात येतील, असं नेदरलँड़्स सरकारने म्हटलं.

युकेमधून युरोपात दाखल होऊ शकणाऱ्या या व्हायरससंदर्भात युरोपियन महासंघातील सदस्य देशांसोबत चर्चा करणार असल्याचंही नेदरलँड्सने म्हटलं. या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने WHO च्या साथरोगतज्ज्ञ मारीया व्हॅन केरखोव्ह यांच्याशी चर्चा केली.

“कोरोना साथ सुरू झाल्यापासूनच या विषाणूने आपल्या स्वरुपात बदल केल्याचं जगभरात आढळून आलं आहे,” असं केरखोव्ह यांनी सांगितलं. व्हायरसच्या नव्या प्रजातीबाबत आपण युके सरकारसोबत संपर्कात आहे, या विषाणूबाबत सखोल चर्चा केली जात आहे, असं WHO ने म्हटलं आहे.

व्हायरसच्या म्यूटेशनबाबत युके सरकारने माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना इतर देशांना याबाबत माहिती देत राहील. या व्हायरसचा अभ्यास सुरू आहे. दुसरीकडे, युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या विधानामुळे खळबळ माजली आहे. नवी प्रजात ही जुन्या प्रजातीपेक्षा 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असं जॉन्सन म्हणाले.

पण अधिकाऱ्यांच्या मते, याबाबत अद्याप सखोल पुरावे उपलब्ध नाहीत. नव्या प्रजातीच्या संसर्गाने मृत्यूदर जास्त असल्याचा किंवा नवी प्रजात लशीला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असल्याचंही अद्याप स्पष्ट नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी याबाबत सांगतात, “सध्याची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाच्या नव्या म्यूटंटबाबत कोणतेही अंदाज आपण सध्यातरी लावू शकत नाही.” विषाणूंच्या स्वरुपात बदल होणं ही गोष्ट नवी नाही. पण ही बदललेली प्रजात कशा पद्धतीने वागते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे यामध्ये जास्त महत्त्वाचं असल्याचं डॉ. केरखोव्ह सांगतात.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *