Latest News आपलं शहर

आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती नियमबाह्य? पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने झाली नियुक्ती?

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रकोप आता पुन्हा दिवसेंदिवस वाढत असताना आताच कुठे जम बसविलेले आणि स्वतः MBBS डॉक्टर देखील असलेले आयुक्त डॉ. विजय राठोड (IAS) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून आता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर तत्कालीन अतिरीक्त आयुक्त दिलीप ढोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच दिलीप ढोले यांची आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली अशी चर्चा शहरात केली जात असली तरी ही नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुळात तांत्रीक दृष्ट्या दिलीप ढोले यांची आयुक्त पदावर नियुक्ती केलीच जाऊ शकत नाही कारण दिनांक १० मे २००४ चा शासन निर्णय क्र.: एमसीओ-१२९५/३३०८/प्र.क्र./१३८/९५/नवि-१४  आणि  दिनांक ४ मे २००६ चा शासन निर्णय क्र.: संकीर्ण-१००५/वर्गीकरण/प्र.क्र.३७९/०५/नवि-२४ नुसार राज्यातील सर्वच ‘ड’ वर्ग महानगरपालिकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (भाप्रसे) अथवा मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी यांचीच नियुक्ती केली जाऊ शकते. त्याच प्रमाणे सन 2019 साली मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी मंजूर करण्यात आलेला आकृतिबंध त्यामध्ये देखील मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पद हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अथवा संवर्ग मुख्याधिकारी करिता राखीव करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शासन नियमानुसार प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय सेवेतील पदावर बादलीने किंवा प्रतिनियुक्तीने नेमणूक करता येणार नाही असा नियम राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.

दिलीप ढोले हे यापूर्वी उपायुक्त वस्तू व सेवा कर संवर्ग या पदावर कार्यरत होते. त्यानंतर ते पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यामानाने तांत्रिकदृष्ट्या दिलीप ढोले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) नाहीत किंवा ते मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी देखील नाहीत आणि म्हणून ते कोणत्याही महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्त पदावर नेमणूक करण्यास पात्र ठरत नाहीत आणि म्हणूनच त्यांची मीरा-भाईंदर महागरपालिकेच्या आयुक्त पदावरील नियुक्ती बेकायदेशीर ठरत आहे.

दिलीप ढोले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर नेमणूक करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडं घातलं आणि त्यासाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणं करण्याची तयारी ही दर्शविली असे बोलले जात आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या दिलीप ढोले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) किंवा मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी नसल्यामुळे यांची सरळ आयुक्त पदावर नियुक्ती करता येणार नाही हे जाणून आधी १९ ऑगस्ट २०२० रोजी त्यांची ‘अतिरिक्त आयुक्त’ पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर आता डॉ. विजय राठोड यांची तडकाफडकी बदली करून दिनांक ३ मार्च २०२१ रोजी ‘आयुक्त’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांच्या नियुक्तीचा विषय वादग्रस्त ठरला आहे.

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत असताना देखील आयुक्तांचे सर्व कामकाज दिलीप ढोले हेच पाहतात, त्यांच्या मंजुरी शिवाय आयुक्त डॉ. विजय राठोड कोणतेही निर्णय घेत नाहीत अशी चर्चा सुरुवाती पासूनच केली जात होती. आयुक्त डॉ. विजय राठोड स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत, प्रत्येक कामाची फाईल आधी दिलीप ढोले यांच्याकडे पाठविली जाते आणि त्यांच्या मंजुरी नंतरच त्या फाईलवर आयुक्त सही करतात असे आरोप केले जात होते. त्यामुळे एका अर्थाने डॉ. विजय राठोड हे फक्त नावापुरते आयुक्त होते परंतु खरे आयुक्त तर दिलीप ढोले हेच आहेत अशी चर्चा सुरुवाती पासूनच केली जात होती आणि आता सरळ आयुक्त पदावर दिलीप ढोले यांची नियुक्ती करण्यात आल्याने या आरोपांना बळ मिळत आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असताना डॉक्टर असलेल्या एका भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्याची अचानक बदली करून त्यांच्या ऐवजी आयुक्त पदावर दिलीप ढोले सारख्या अयोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता आयुक्त दिलीप ढोले यांच्या आयुक्त पदाच्या नियुक्तीच्या विरोधात अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पासून ते थेट राज्यपालांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवर आता काय कारवाई केली जाते आणि दिलीप ढोले यांचे आयुक्त पद कायम राहते किंवा नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *