Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा भाईंदरचे शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा खोटा?

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मिरा भाईंदर: शिवसेनेच्या बंडखोर गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक, अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा दावा केला आहे. मात्र संध्याकाळ पर्यंत ह्या बातमीची शहानिशा केली असता आमदार प्रताप सरनाईक यांचा दावा निखालस खोटा असल्याचे निष्पन्न झाले असून १९ नागरसेवकांपैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईकां सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचे सिद्ध झाले आहे.

याबाबत अधिक माहिती करिता मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे प्रवक्ते शैलेश पांडे यांचेशी संपर्क केला असता “शिवसेनेत कोणताही वेगळा गट नाही जे नगरसेवक, पदाधिकारी आहेत ते सर्व शिवसैनिकच आहेत. आज काही मोजके नगरसेवक, काही पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात गेले होते हे जरी सत्य असले तरी त्यापैकी कुणीही अद्याप कुठेही गेलेले नाही ते सर्व शिवसेनेतच आहेत” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आलेले एकूण २२ नगरसेवक होते त्यापैकी अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केलेला आहे. एक नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता सध्यस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण १९ अधिकृत नगरसेवक असून विक्रम प्रतापसिंह हे नामनिर्देशित नगरसेवक आहेत. त्यापैकी फक्त आठ नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक सोबत आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या आठ नागरसेवकांपैकी देखील हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोघांना आधी प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात एका दुसऱ्या कामाचे कारण सांगून बोलावून घेतले आणि मग तिथून पुढे काहीही न सांगता मुंबईला घेऊन गेले असे हेलन बोर्जिस आणि एलायस बांड्या या दोन्ही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

मुळात मिरा भाईंदर शहरातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसत होते आणि म्हणूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर नियुक्त केले होते. प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आल्या पासूनच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे शीत युद्ध सुरु असल्याचे बोलले जात होते. मिरा भाईंदर शहरातील विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो कि, पक्षाचा काही अधिकृत कार्यक्रम असो प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदे क्वचितच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहात होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्यामागचे कारण देखील शिंदे-सरनाईक यांच्यातील वितुष्ट असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मग आता अचानक प्रताप सरनाईक यांचे मन परिवर्तन कसे झाले? प्रताप सरनाईक उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करुन एकनाथ शिंदे गटात सामील कसे झाले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून. शिंदे-सरनाईक यांच्या घनिष्ठ संबंधाचे कारण ईडीचा कारनामा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.

मिरा भाईंदर शहरात शिवसेनेत आपले किती वर्चस्व आहे हे दाखविण्यासाठीच आमदार प्रताप सरनाईक यांनी आजचा केविलवाणा खटाटोप केला असला तरी मात्र शिवसेनेचे सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत असल्याचा त्यांनी केलेला दावा फोल ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.राजू भोईर
2.कमलेश भोईर
3.धनेश पाटील
4.श्रीमती संध्या पाटील
5.अनंत शिर्के
6.इलायस बंड्या
7.हेलन बोर्जिस
8.सौ वंदना पाटील

आमदार प्रताप सरनाईक यांचे सोबत न गेलेल्या नगरसेवकांची नावे.-
1.सौ नीलम ढवण (गटनेत्या)
2.प्रवीण पाटील
3.जयंती पाटील
4.श्रीमती तारा घरत
5.सौ स्नेहा पांडे
6.सौ भावना भोईर
7.सौ अर्चना कदम
8.दिनेश नलावडे
9.सौ कटलीन परेरा
10.सौ शर्मिला बगाजी
11.सौ कुसुम गुप्ता

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *