Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश मनोरंजन महाराष्ट्र

संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलचे झाले दिमाखात उद्घाटन!

हजारो नागरिकांचा पहिल्याच दिवशी प्रतिसाद; शंकर महादेवन यांच्या गायनाने मिरा-भाईंदरकर रसिक मंत्रमुग्ध

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील सर्वात मोठ्या ‘संस्कृती मिरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल’ चे काल राज्य सरकारचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शानदार जल्लोषात , प्रचंड गर्दीत उदघाटन झाले. पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या प्रत्यक्ष लाईव्ह गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो मिरा-भाईंदरकर संगीत रसिक या गायनाचे साक्षीदार बनलेच आणि ते मंत्रमुग्ध झाले. मिरा-भाईंदर शहरातील हजारो नागरिकांनी पहिल्या दिवशी या भव्य महोत्सवाला भेट देऊन आनंद घेतला.

प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे.

संपूर्ण मैदान फेस्टिव्हलसाठी सजले असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मिरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिवलचे उद्धाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, मिरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष रवि व्यास, युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रात्री या कार्यक्रमाला केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती होती. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, तुतारीच्या निनादात जल्लोषात महोत्सवाचे उदघाटन झाले.

देश-विदेशातील सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला हजारो मीरा भाईंदरकर उपस्थित होते. आपल्या गाण्याच्या अनोख्या शैलीत शंकर महादेवन यांनी त्यांची बहुतेक गाजलेली गाणी सादर केली आणि त्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत होता,

प्रत्येक गाण्यावर उपस्थित संगीत रसिक थिरकले, तरुण-तरुणी अक्षरश: नाचत होते. आमदार प्रताप सरनाईक हे माझे गेल्या २० वर्षांपासून मित्र असून त्यांच्यामुळे मी मिरा भाईंदरमध्ये हा लाईव्ह शो करीत आहे, मिरा भाईंदर सारखे दर्दी रसिक प्रेक्षक कुठेच नाहीत, असे सांगत शंकर महादेवन यांनी या भव्य कला महोत्सवाचे कौतुक केले.

या कला महोत्सवाचे उदघाटक मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, “शहर विकासाच्या दिशेने जात असताना जनतेची सांस्कृतिक भूक भागवणे हे सुद्धा गरजेचे आहे. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांचे व त्यांच्या टीमचे या भव्य फेस्टिव्हल आयोजनाबद्दल मन:पूर्वक कौतुक करतो. कोरोनाच्या नंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागातील जनतेची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्याचे काम या मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ज्याचा गौरव करावा असा फार मोठा ‘उपवन आर्ट फेस्टिवल’ आमदार सरनाईक ठाण्यात गेली अनेक वर्षे आयोजित करतात. अशा फेस्टिव्हलची सातत्याने ठाणेकर व ठाण्याच्या आसपास राहणारे नागरिक वाट पाहत असतात. आज तशीच लक्षवेधी रोषणाई, किंबहुना उपवन फेस्टिव्हल पेक्षाही चांगली रोषणाई मिरा-भाईंदर मध्ये मी स्वतः अनुभवली. एखादी गोष्ट फार मनापासून करण्याचे काम सरनाईक करीत असतात. एखादा कार्यक्रम ज्यावेळी ते करत असतात त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये जीव ओतून त्या कार्यक्रमाची उंची वाढविण्याचे काम प्रताप सरनाईक सातत्याने करतात म्हणूनच हा फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने जात आहे” असे सांगत आमदार सरनाईक यांचे मंत्री चव्हाण यांनी कौतुक केले.

रामदास आठवले यांच्या कवितांना प्रतिसाद!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आर्ट फेस्टिव्हलला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. ‘मुझे भी है संगीत का ज्ञान, इसलिये मै हू शंकर महादेवन का फॅन’, ‘जो गाता है मन भावन, नाम है उनका शंकर महादेवन’, ‘प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदरमध्ये उभा केला आहे हेवन, कारण इथे आलेले आहेत शंकर महादेवन’ अशा कविता सादर करून आठवले यांनी प्रचंड टाळ्या मिळवल्या. प्रताप सरनाईक हे कार्यसम्राट आमदार आहेत, खूप विकासकामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत. मोठे नाट्यगृह, विविध समाज भवने व अनेक विकासकामे सरनाईक यांनी केली आहेत. सरनाईक यांचा नंबर जरूर मंत्रिमंडळ विस्तारात लागेल. एकदा तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री तुमचा नक्की विचार करतील आणि मी तुमची शिफारस करेल अशा शब्दात आठवले यांनी कौतुक केले.

आर्ट फेस्टिव्हलचे आकर्षक प्रवेश द्वार, रांगोळी प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, विविध कला प्रदर्शन यांच्या दालनातही नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच लहान मुलांसाठी ‘गेम झोन’ खाद्यप्रेमींसाठी खाद्य विभाग, कल्चरल ऍक्टिव्हिटी, फन फेयर, सेल्फी पॉईंटसह अनेक आकर्षक कला-संस्कृतीशी निगडित गोष्टी फेस्टिव्हलमध्ये असून १२ डिसेंबरपर्यंत फेस्टिव्हलमध्ये मीरा भाईंदरच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *