मुंबई, प्रतिनिधी : राज्यात आणि देशात गाजलेल्या बॉलिवूडच्या बातम्यांपैकी सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी. ने काल न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे.
एन.सी.बी.चे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः आरोपपत्र सादर केले आहे.
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून एन.सी.बी.कडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तब्बल ३० हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. रियाला अटक सुद्धा करण्यात आलं होतं. तसंच एक महिना ती तुरूंगातही होती. रियाचं नावही आरोपपत्रात असून, ३० हजार पानांच्या या आरोपपत्रांमध्ये रियाच्या भावासह ३३ जणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना एन.सी.बी ने काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.
त्याच्या मृत्यूवरून नंतर प्रचंड वादविवाद झाले.
सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता.
सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली ?
हा वाद सुरू असतानाच ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं.
या प्रकरणात एन.सी.बी.ने तपास सुरू केला होता.
अनेक ठिकाणी धाडी टाकत एन.सी.बी.ने ड्रग्ज जप्त केलं होतं. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मा. न्यायालय काय न्याय निवाडा देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.