संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कधी दिवसा तर कधी बहुतांश वेळा रात्रीच्या वेळेस कानाचे पडदे फाटतील इतके कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बाईक स्वारांना कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कानठळ्या बसवणारे आवाज करणारे तब्बल ११८ हून अधिक मॉडीफाईड सायलेन्सर पोलिसांनी चक्क रोडरोलर चालवून ते नष्ट केले आहेत.
कोरोनामुळे आलेले निर्बंध शिथिल होताच कल्याणात पुन्हा एकदा अशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या बाईकस्वारांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. दिवसासह विशेषतः रात्रीच्या वेळेस तर मोकळ्या रस्त्यांवर सुस्साट बुलेट चालवण्यामुळे परिसरातील नागरिकांना खूपच त्रास होत होता. कोरोनामुळे अनेक नागरिकांना रक्तदाब, हृदयाचे आजार किंवा मानसिक आजार जडले आहेत. अशा व्यक्तींसाठी तर या मॉडीफाईड सायलेन्सरचा आवाज जणू काही जीवघेणा ठरू लागला होता.
कंपनीकडून बसवण्यात आलेले मर्यादित आवाजाचे सायलेन्सर काढून त्याजागी आवाजाने डोकं फुटेल इतक्या कानठळ्या बसवणारे मॉडीफाईड सायलेन्सर लावण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा बाईकस्वारांना वारंवार सूचना देऊनही ‘पालथ्या घड्यावर पाणी’ याम्हणीप्रमाणाचे त्यांचे वर्तन झाले होते. परिणामी लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या या बुलेट बाईक स्वारांना अखेर वाहतूक पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून अद्दल घडवायचा निर्णय घेतला. आणि आज तो अंमलातही आणल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बुलेटच्या तब्बल ११८ मॉडीफाईड सायलेन्सरवर रोडरोलर चालवण्यात आला. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातील चौकात ही कारवाई करण्यात आली.