संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक समजल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु करण्यात आले आहे. कल्याण मलंग गड रोड वरील तमन्ना रेसिडन्सी या इमारती मधील तिसर्या आणि चौथ्या माळ्यावरील या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. किन्नरांसाठी मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या किन्नर अस्मिता संस्थेकडून हे केंद्र चालविले जाणार आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या संस्थापिका नीता केणे यांनी याबाबत बोलताना आजपर्यत समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
या समाजातील किन्नरांना उदर निर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना भिक मागावी लागते. नृत्य करून इतरांचे मनोरंजन करावे लागते किंवा शरीर विक्री व्यवसाय करावा लागतो. त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवारा केंद्राची संकल्पना राबविली आहे. या केंद्रात केवळ राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार नसून समाजातील किन्नरांना शिक्षणाबरोबरच रोजगारासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. इतर राज्यात किन्नरांना शिक्षणासाठी रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून पेन्शन दिली जाते मात्र महाराष्ट्रात हा समाज उपेक्षित राहिला असून सरकारने इतरा प्रमाणेच किन्नरांना देखील सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. नीता केणे (अध्यक्षा किन्नर अस्मिता) यांनी मागणी केली आहे हा घटक सुद्धा समाजातील भाग आहे हे सरकारने ओळखले पाहिजे अशी आम्हाला आशा आहे .
दरम्यान किन्नरासाठी सुरु करण्यात आलेल्या गरिमा होमच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारच्या निवासाची व्यवस्था झाल्याबद्दल त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.